पुणे : ‘पुणे ग्रॅंड चॅलेंज टूर’ सायकल स्पर्धेनिमित्त सोमवारी (१९ जानेवारी) शहरातील प्रमुख रस्ते, तसेच उपरस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता), गणेशखिंड रस्ता, जंगली महाराज रस्त्यासह स्पर्धा मार्गावरील उपरस्ते सकाळी नऊ ते सायंकाळी सहा यावेळेत बंद ठेवण्यात येणार आहेत.
‘आंतराष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धोत ४० देशातील १७१ स्पर्धेक सहभागी होणार आहे. स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी मध्यभागातील प्रमुख रस्त्यांसह विविध रस्ते वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी सहकार्य करावे’, असे आवाहन सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत केले. अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, वाहतूक शाखेचे उपायुक्त हिंमत जाधव या वेळी उपस्थित होते. .
‘पुणे जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या सहकार्याने १९ ते २४ जानेवारी दरम्यान विविध टप्यात ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी ‘प्रोलॉग’ स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचा मार्ग खंडोजी बाबा चौक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौक (गुडलक चौक), तुकाराम महाराज पादुका चौक, ललित महल चौक, चापेकर चौक, रेंजहिल, वेधशाळा चौक, संचेती चौक, जंगली महाराज रस्ता, झाशीची राणी लक्ष्मीबाई चौक, डेक्कन जिमखाना बस स्थानक असा असणार आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, गणेशखिंड रस्ता, तसेच जंगली महाराज रस्ता, उपरस्ते वाहतुकीस बंद राहणार आहेत’, असे त्यांनी सांगितले.
अत्यावश्यक सेवावगळता सर्व वाहनांना बंदी
स्पर्धा मार्गावर रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब, पोलिसांचे वाहनांसह तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळून अन्य सर्व वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. स्पर्धा मार्गावर दुतर्फा वाहने लावण्यास (नो-पार्किंग) बंदी घालण्यात आली आहे. स्पर्धा मार्गावरील रुग्णालयांशी संपर्क साधण्यात आला आहे. रुग्णवाहिकांना मार्ग उपलब्ध करुन देणे, तसेच त्वरीत वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देण्याच्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येणार आहे, असे सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितले.
वाहनचालकांसाठी पर्यायी मार्ग
स्पर्धा मार्गावरील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आल आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. वाहनचालकांसाठी स्वारगेट, सारसबाग, नळस्टाॅप, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, रेंजहिल, खडकी, जुना-मुंबई पुणे रस्ता, पाटील इस्टेट, संगम पूल, आरटीओ, शाहीर अमर शेख चौक, मालधक्का चौक, बोल्हाई चौक, नेहरू रस्ता, स्वारगेट असा वर्तुळाकार मार्ग निश्चित करण्यात आला आहे. वाहनचालकांनी शक्यतो मध्यभागातील प्रमुख रस्ते वापरण्याचे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
‘पुणे ग्रॅंड चॅलेज टूर’ स्पर्धा १९ ते २४ जानेवारी दरम्यान वेगवेगळ्या टप्यात होणार आहे. १९ जानेवारी रोजी होणाऱ्या ‘प्रोलाॅग’ स्पर्धेच्या निमित्ताने मध्यभागातील वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांची शक्यतो गैरसोय होऊ नये म्हणून स्पर्धा मार्गावर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. वाहनचालकांना पर्याय मार्ग उपलब्ध करुन देणे, तसेच आवश्यक त्या सूचना देण्यात येणार आहे. वाहनचालकांनी पोलिसांना सहकार्य करावे. आंतराष्ट्रीय स्तरावरील ही स्पर्धा सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे.- रंजनकुमार शर्मा, सहपोलीस आयुक्त
स्पर्धेचे टप्पे
या स्पर्धेचा एक टप्पा २३ जानेवारी रोजी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये असणार आहे. ९९ किलोमीटरची ही स्पर्धा असणार आहे. त्यापैकी ५८ किलोमीटर मार्ग पुणे शहरातील असणार आहे. २३ जानेवारी शहरात वाहतूक बदल करण्यात येणार आहेत. त्यादिवशी वाहतूक टप्प्याटप्प्याने बंद करण्यात येणार आहे. बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथून स्पर्धेचा प्रारंभ होणार आहे. जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात समारोप होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.
