पुणे : ‘आपल्याकडे वाहन चालविताना शिस्तीचे पालन केले जात नाही. मग, पोर्शे मोटारीसारखा एखादा अपघात झाल्यानंतर आपण हळहळतो. ते संपल्यावर पुढचे पान उलटतो. आपल्यावर कठोर कारवाई होईल, ही भीती जोपर्यंत बेशिस्त वाहनचालकांना वाटणार नाही, तोपर्यंत परिस्थितीमध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षाही ठेवणे चुकीचे ठरेल,’ असे मत वाहतूक अभ्यासक आणि परिसर संस्थेचे कार्यकारी संचालक रणजित गाडगीळ यांनी व्यक्त केले.
गाडगीळ म्हणाले, ‘परदेशामध्ये वाहन हाती आल्यापासून वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे बिंबविले जाते. चुकूनही नियमांचे उल्लंघन झाले, तर मोठ्या रकमेच्या दंडासह वाहन परवाना रद्द होण्याची कठोर कारवाई केली जाते. त्याच्या विपरीत परिस्थिती आपल्याकडे आहे. त्यामुळे दारू पिऊन वाहन भरधाव चालविले जाते. उलट दिशेने वाहन चालविले जाते. यामध्ये केवळ जनजागृती करून प्रश्न सुटणार नाही. तर, कठोर कारवाई करण्याची गरज आहे. किंबहुना कारवाईला पूरक म्हणून जनजागृती केली पाहिजे. अन्यथा, नागरिक रस्त्यावर आपल्याला हवे तसेच वागतील.
‘रस्त्यांवर पादचारी मार्ग, झेब्रा क्राॅसिंग, वळणाचे दिशादर्शक फलक यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. आहे त्या गोष्टींची निगा राखली जात नाही. नवीन रस्ते आणि उड्डाणपूल बांधणीची चर्चा होते. अपघात कमी करण्यासंदर्भात राजकीय पातळीवरही अनास्था जाणवते,’ याकडे गाडगीळ यांनी लक्ष वेधले.