पुणे : तुळापुरातील ‘प्रोजेक्ट एक्स’ पार्टीत राजा बहादूर मिल परिसरातील एका पबमधून मद्यसाठा पुरविण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. मद्याची विक्रीचा परवाना पबमधील जागेपुरता मर्यादित असताना अन्य ठिकाणी तो पाठविण्यात आला. या प्रकरणात संबंधित पबविरुद्ध कारवाई करण्याचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे.
तुळापुरातील एका बंगल्यात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने छापा टाकला. या पार्टीला रात्री साडेअकरापर्यंत परवानगी होती. मात्र, ही पार्टी पहाटेपर्यंत सुरू होती. या पार्टीतून पोलिसांनी मद्यसाठा, तीन ग्रॅम गांजा, अन्य मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी पार्टीच्या आयोजकांसह ७८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या पार्टीच्या आयोजनात राजा बहादूर मिल परिसरातील पबमालकाचा सहभाग असल्याचे उघडकीस आले. तपासात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यसाठ्याबाबत चौकशी केली.
मद्य वितरण नोंदीची माहिती घेतल्यानंतर संबंधित मद्यसाठाविक्रीची परवानगी पबला देण्यात आली. पबमधील मद्यसाठा टेम्पोतून तुळापुरातील पार्टीच्या ठिकाणी नेण्यात आल्याचे उघडकीस आले. परवान्यातील अटींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून संबंधित पबविरुद्ध कारवाईचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे पाठविला आहे.
या बाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे म्हणाले, “संबंधित पबला मद्य विक्री, वितरणाची परवानगी संबंधित जागेपुरती दिली होती. मात्र, पबमधील मद्यसाठा अन्य ठिकाणी नेण्यात आला. नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.” जिल्हाधिकारी कार्यालयाने या प्रस्तावानुसार कारवाई केल्यास ती दंडात्मक स्वरुपात केली जाऊ शकते. परवाना निलंबन किंवा परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाऊ शकते.
