पुणे : ‘तपत्या झळा उन्हाच्या झेलीत चाललो’ हे पं. जितेंद्र अभिषेकी यांच्या स्वरांतील गीत दररोज गुणगुणावे अशा परिस्थिती वाढत्या तापमानाने झाली आहे. अशा उन्हाच्या झळांपासून मुक्ती घेत तुळशीबागेत खरेदी करण्याची संधी महिलांसह नागरिकांना उपलब्ध झाली आहे. ‘प्रेमाची हेमंत सावली’ या उपक्रमाद्वारे लावण्यात आलेले हरीत जाळे (ग्रीन नेट) पुणेकरांना उन्हाची काहिली काही प्रमाणात कमी करण्यासाठी आधार झाली आहे. शिशिर ऋतुचे गमन होऊन वसंत ऋतुची चाहूल लागण्यापूर्वी उन्हापासून बचाव करण्याची हरीत जाळे उपयुक्त ठरणार आहे.
शहरातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर ऐतिहासिक तुळशीबाग परिसरात खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना, महिलांना उन्हापासून दिलासा मिळावा या उद्देशाने आमदार हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून आणि छोटे व्यावसायिक असोसिएशन, तुळशीबाग संस्थेच्या सहभागातून हरीत जाळे म्हणजेच ग्रीन नेट लावण्याचा उपक्रम राबविण्यात आला आहे.
‘प्रेमाची हेमंत सावली’ या नावाने हा उपक्रम साकारण्यात आला असून यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे. महिला दिनाच्या निमित्त तुळशीबागेत खरेदीसाठी येणाऱ्या सर्व माता-भगिनींना उन्हाच्या तीव्र झळांपासून संरक्षण मिळावे, तसेच त्यांना आरामदायी वातावरणात खरेदी करता यावी या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला आहे. तुळशीबाग ही पुण्यातील ऐतिहासिक आणि सर्वाधिक वर्दळीची बाजारपेठ असून येथे दररोज मोठ्या प्रमाणावर महिला खरेदीसाठी येतात. त्यामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
याबाबत माहिती देताना नगर पथ विक्रेता समिती सदस्य सागर दहीभाते म्हणाले, ‘तुळशीबाग परिसरात दररोज साधारण १० ते १२ हजार ग्राहक येतात. ‘ग्रीन नेट’मुळे ग्राहकांना उन्हापासून मोठा दिलासा मिळत आहे. सावलीमुळे बाजारपेठेतील वातावरण अधिक सुखद झाले असून व्यापारी आणि ग्राहक दोघांनाही याचा लाभ होत आहे. ऐतिहासिक तुळशीबाग परिसरात येणाऱ्या नागरिकांना उष्णतेपासून संरक्षण मिळावे आणि खरेदी करताना त्यांना सोयीस्कर वातावरण मिळावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. व्यापारी आणि नागरिक यांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम सातत्याने राबविता येत आहे.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. नगरसेविका स्वप्नाली पंडित, संघटनेचे अध्यक्ष राजाभाऊ धावडे, अमित कंक, नरेश तडका, सागर गुळुमकर, चकोर सुबंध, राजेश व्हावळ, परेश ठक्कर, नरेश माळवे, नितीन पंडित यांच्यासह परिसरातील व्यापारी आणि ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
