पुणे : तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पिशवीतून सहा लाख २७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३९ वर्षीय महिला वाघोली भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. १९ एप्रिल रोजी सायंकाळी त्या तुळशीबागेत नातेवाईकांसोबत खरेदीसाठी आल्या होत्या. अक्षय्य तृतीया असल्याने त्यांनी सराफी पेढीतून दागिने खरेदी केले होते. दागिने एका छोट्या खोक्यात ठेवण्यात आले होते. हे खोके त्यांनी पिशवीत (पर्स) ठेवले होते. अक्षय तृतीया असल्याने तुळशीबागेत खरेदीसाठी गर्दी होती.
तुळशीबागेतील बँक ऑफ महाराष्ट्राच्या गल्लीत चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून दागिने ठेवलेले खोके चोरून नेले. महिला घरी पोहोचल्यानंतर पिशवीतून दागिने ठेवलेले खोके चोरून नेल्याचे लक्षात आले. चोरट्यांनी सहा लाख २७ हजार रुपयांचे दागिने चोरुन नेल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. महिलेने नुकतीच पोलिसांकडे फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर तपास करत आहेत.
तुळशीबाग हे महिलांचे खरेदीचे आवडते ठिकाण आहे. अगदी परराज्य, तसेच परदेशातून महिला पुण्यात आल्या की तुळशीबागेत खरेदीसाठी येतात. गेल्या काही दिवसांपासून तुळशीबागेत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. यापार्श्वभूमीवर तुळशीबागेत पोलिसांनी गस्त वाढवावी. महिलांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी तुळशीबाग व्यापाारी असोसिएशनचे पदाधिकारी, तसेच छोटे व्यावसायिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच केली होती.
तुळशीबागेतील चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गस्त वाढवावी, तसेच आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात आली आहे. तुळशीबागेत सध्या बसविण्यात आलेले कॅमेरे विचारात घेता तेथे अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासनाशी चर्चा करण्यात येणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी नुकतीच दिली होती.
तुळशीबाग महिलांसाठी असुरक्षित
तुळशीबागेत खरेदीसाठी जाणाऱ्या महिलांच्या पिशवीतून (पर्स) दागिने, रोकड चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या काही महिन्यात तुळशीबागेत खरेदी करणाऱ्या महिलांच्या पिशवीतून ऐवज चोरीला जाण्याच्या सहा ते सात घटना घडल्या आहे. चोरट्यांच्या सुळसुळाटाामुळे महिला वर्गाचे खरेदीचे हक्काचे ठिकाण असुरक्षित झाले झाले आहे. तुळशीबागेत खरेदी करण्याचे अप्रुप महिलांना असते. तुळशीबागेतील अरुंद गल्ल्यांमधील गर्दीत खरेदी करणाऱ्या महिलांच्या पिशवीतून दागिने, रोकड चोरीला जाण्याच्या घटना वाढल्या आहेत.
