विवाह समारंभातून अडीच लाखांचे दागिने चोरट्यांनी लांबविल्याची घटना हडपसरमधील मगरपट्टा परिसरात घडली. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

ज्येष्ठ महिलेच्या नातीचा विवाह समारंभ मगरपट्टा सिटी परिसरातील लक्ष्मी लॉनमध्ये पार पडला. तक्रारदार महिला वधुची आजी आहे. विवाह समारंभासाठी त्या बेळगावहून आल्या होत्या. स्वागत समारंभ सुरु असताना त्यांना कुटुंबासह छायाचित्र काढण्यासाठी व्यासपीठावर बोलविण्यात आले. त्यांनी दागिने असलेली पिशवी खुर्चीवर ठेवली. छायाचित्र काढून त्या खुर्चीजवळ आल्या. तेव्हा दागिने आणि मोबाइल संच असलेली पिशवी चोरट्यांनी लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.

पोलिसांनी लक्ष्मी लॉन परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले आहे. पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण तपास करत आहेत.