महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार लष्करी जवानासह सहप्रवासी मृत्युमुखी पडल्याची घटना पुणे-सोलापूर रस्त्यावरील रेसकोर्स परिसरात घडली.

हनुमंत दगडू काळे (वय ४३), दत्ता पोपट काळे (वय ४०, दोघे रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी ट्रकचालक इसरार अहमद मोहम्मद इलियास शेख (वय ४०, रा. शिवाजीनगर) याला अटक करण्यात आली. पोलीस कर्मचारी राजाराम कलजी यांनी या संदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दुचाकीस्वार हनुमंत काळे लष्करात जवान होते. सध्या त्यांची नेमणूक उत्तराखंड येथे होती. सुट्टी मिळाल्यानंतर ते मूळगावी जाणार होते. दत्ता काळे हनुनंत काळे यांच्या नात्यातील आहेत. दत्ता काळे यांचे हडपसर भागात काम होते. काम आटोपून दोघेजण मूळगावी जाणार होते. दुचाकीस्वार हनुमंत काळे आणि सहप्रवासी दत्ता काळे पुणे-सोलापूर रस्त्यावरून शुक्रवारी (५ ऑगस्ट) सकाळी साडेअकराच्या सुमारास जात होते. रेसकोर्स परिसरातील टर्फ क्लब चौकात महापालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. ट्रकच्या धडकेने दुचाकी दुभाजकावर आदळली. अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त पौर्णिमा तावर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप शिवले यांनी घटनास्थळी भेट दिली. दोघांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे तपास करत आहेत.