पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात वाहनांच्या धडकेत दोन पादचाऱ्यांचा मृत्यू झाला. कात्रज घाटात भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख पटली नाही, तसेच मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे भागात बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
पोलीस शिपाई सौरभ साळवे यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. त्याचे वय अंदाजे ४० वर्ष आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (११ नोव्हेंबर) पहाटे पाचच्या सुमारास कात्रज घाटातून निघालेल्या पादचारी तरुणाला भरधाव वाहनाने धडक दिली. अपघातात पादचारी तरुणाचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाची ओळख पटलेली नाही. त्याची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तो फिरस्ता असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक समीर शेंडे तपास करत आहेत.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर वारजे भागात खासगी बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (१० नोव्हेंबर) सायंकाळी घडली. विश्वास पांडुरंग पडवळ (वय ५५, रा. देशमुखवाडी, शिवणे) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांचा भाऊ दीपक पडवळ (वय ५०, रा. कोळीवाडा, मुंबई) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पडवळ हे वारजे भागातील विनायक हॉस्पिटलसमोरील रस्ता सोमवारी सायंकाळी ओलांडत होते. त्यावेळी प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसच्या धडकेत पडवळ गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच वारजे पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे तपास करत आहेत.
दरम्यान, पीएमपी बसच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणीच्या मृत्यू झाल्याची घटना जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर पाटील इस्टेट भागात मंगळवारी घडली. अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला आहे. श्वेता शंकर दोडमणी (वय २३, रा. देहूरोड) असे मृत्युमुखी पडलेल्या सहप्रवासी तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपी बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भरधाव वेगामुळे गंभीर अपघात
शहरात गंभीर स्वरुपाच्या अपघातांच्या घटना वाढल्या आहेत. भरधाव वेग आणि वाहन चालकांच्या चुकांमुळे अपघाताच्या घटना घडल्या आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
