पुणे : शहरात ‘युनिफाइड डेव्हलपमेंट कंट्रोल अँड प्रमोशन रेग्युलेशन्स’मुळे (यूडीसीपीआर) लहान भूखंडांवर वाढीव बांधकामाची परवानगी दिली जाते. मात्र, वाढणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत आवश्यक रस्ते, पार्किंग, पाणीपुरवठा, ड्रेनेज, अग्निसुरक्षा यांसारख्या पायाभूत सुविधा वाढलेल्या नाहीत. यामुळे नागरिकांना अनेक सोयीपासून वंचित राहावे लागत आहे. पुणे शहराच्या भविष्यातील नियोजनाचा विचार करून लहान भूखंडांवरील वाढीव बांधकाम (एफएसआय) क्षमतेच्या तरतुदींचा फेरविचार करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नागसेवकांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

भाजपचे नगरसेवक आणि शहर सुधारणा समितीचे सदस्य पुनीत जोशी यांनी ‘वाढीव एफएसआय’चा फेरविचार करावा,’ अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. बांधकामांना परवानगी देताना ‘यूडीसीपीआर’चा आधार घेतला जात जात असल्याने लहान भूखंडांनाही मोठ्या प्रमाणात वाढीव बांधकाम क्षमता उपलब्ध होत असल्याकडे जोशी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधले आहे.

लहान भूखंडांवर वाढीव प्रमाणात बांधकाम करण्याची तरतूद असल्याने बांधकामांचे प्रमाण वाढले आहे. उंच इमारतींचे इमले उभे राहत आहेत. मात्र, त्या तुलनेत या लोकसंख्येला आवश्यक असलेल्या पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज व्यवस्था यासह वाहतूककोंडी सोडविण्यासाठी आवश्यक असलेले रस्ते महापालिकेला उपलब्ध होत नाहीत. याचा परिणाम नागरिकांच्या जीवनमानावर होत आहे. या नियमावलीचा फेरविचार करण्याची आवश्यकता असल्याची मागणी नगरसेवक जोशी यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवित भाजप नगरसेवक जोशी यांनी याचे उदाहरण देऊन ही गोष्ट पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. जोशी म्हणाले, कोथरूड येथील आयडियल कॉलनी परिसरात पूर्वी असलेल्या इमारतींमध्ये मर्यादित सदनिका होत्या. पाच ते सहा गुंठ्यांच्या जागेत असलेल्या इमारतींच्या प्रत्येक अपारमेंट मध्ये केवळ १२ ते १४ फ्लॅट होते. मात्र नवीन नियमावलीचा आधार घेतल्यास या भागात आता ४० ते ४५ फ्लॅट उभारण्याची क्षमता निर्माण झाली आहे.

या तुलनेत या परिसरात असलेले रस्ते, ड्रेनेज व्यवस्था पाणीपुरवठा व्यवस्था, घनकचरा व्यवस्था यासह इतर पायाभूत सुविधांमध्ये मात्र कोणतीही वाढ झालेली नाही. ‘यूडीसीपीआर’नुसार, किमान १५ हजार चौरस फुटांपेक्षा मोठ्या भूखंडांसाठी वाढीव बांधकाम क्षमतेचा (एफएसआय) लाभ देण्याचा विचार करावा,’ असेही जोशी म्हणाले.

‘क्लस्टर डेव्हलपमेंट’चा पर्याय

शहरातील लहान भूखंड एकत्र करून नियोजित पद्धतीने विकास केल्यास अधिक मोकळी जागा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे अंतर्गत रस्ते आणि प्रवेशमार्ग अधिक सक्षम करता येतील, पार्किंगचे योग्य नियोजन करता येईल. पाणी, ड्रेनेज आणि अन्य सुविधांचेही सक्षम नियोजन करता येणार असल्याने ‘क्लस्टर डेव्हलपमेंट’ला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे जोशी यांनी म्हटले आहे.