पुणे : शहरातील विविध भागांत १३ शाळा बेकायदा पद्धतीने चालविल्या जात असल्याची माहिती महापालिकेच्या शिक्षण विभागाने केलेल्या तपासणीमध्ये पुढे आली आहे. या शाळांमध्ये कोणीही प्रवेश घेऊ नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे. महापालिकेने २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात केलेल्या तपासणीमध्ये शहरातील १३ शाळा विनापरवानगी सुरू असल्याचे समोर आले आहे. शाळा सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता न केल्याने या शाळा बेकायदा ठरविण्यात आल्याचे महापालिकेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

शहरातील बिबवेवाडी, येरवडा, कोंढवा, हडपसर, , उंड्री, आंबेगाव या परिसरातील १३ शाळांचा समावेश या यादीत आहे. या शाळा कोणतीही परवानगी न घेता चालविण्यात येत असल्याने तेथे प्रवेश घेऊ नयेत. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास होणारे नुकसान टाळण्यासाठी पालकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

शहराचा विस्तार चारही दिशांना होत असल्याने गेल्या काही वर्षांमध्ये शहराच्या लोकसंख्येतही मोठी वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. वाढते नागरिकरणामुळे गरजा देखील वाढल्या असून नागरिकांची गरज ओळखून प्रत्येक भागात नव्याने शाळा सुरु होत आहेत.

दरवर्षी या शाळेंच्या संख्येत भरच पडत असून शाळा सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही परवानगी न घेता बिनधास्तपणे शाळा सुरु केल्या जात आहेत. घराच्या जवळच शाळा असल्याने पालकांकडून या शाळांमध्ये पाल्यासाठी प्रवेश घेतला जातो. त्यानंतर ही शाळा बंद झाल्यास संबधित शाळेत प्रवेश मिळविलेल्या मुलांचे आणि संबधित पालकांचे नुकसान होते. संबधित शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षे वाया जाते.

पालकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी महापालिकेचा शिक्षण विभाग दरवर्षी शहरात नव्याने सुरु झालेल्या शाळांची तपासणी करतो. संबधित शाळा नियमाप्रमाणे सुरु झाली आहे का, आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करण्यात आली आहे की नाही, याची शहानिशा केली जाते. त्यामधून महापालिकेच्या शिक्षण विभागाने ही माहिती प्रसिद्ध केली आहे.

बेकायदा शाळा

  • न्यू मिलेनिअम स्टार इंग्लिश मीडिअम स्कूल (बिबवेवाडी)
  • महात्मा गांधी प्रशाला (येरवडा)
  • टीम्स तकवा इस्लामिक स्कूल अँड मक्तब (कोंढवा खुर्द)
  • सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल (कोंढवा बुद्रुक)
  • इमॅन्युअल पब्लिक स्कूल (हडपसर)
  • आकांक्षा ॲकॅडमी स्कूल (लोहगाव)
  • एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशनची आर्यन पब्लिक स्कूल (नऱ्हे )
  • लेगसी हायस्कूल (कोंढवा)
  • शिबली नोमानी इंग्लिश मीडिअम स्कूल (कोंढवा)
  • ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूल (उंड्री)
  • ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टची इकरा इस्लामिक स्कूल (कोंढवा)
  • ग्लोबल इंग्लिश मीडिअम स्कूल (आंबेगाव बुद्रुक)
  • आर्यन वर्ल्ड स्कूल (उंड्री)