व्यसनमुक्तीसाठी प्रेरणादायी कार्य करणारे डॉ. अनिल अवचट, ग्रामीण विकासासाठी कार्यरत असलेल्या नीलिमा मिश्रा, ज्येष्ठ विचारवंत यशवंत मनोहर, आपल्या चतुरस्र अभिनयाने रसिकांच्या मनाचा ठाव घेणारे अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्यासह सात जणांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘जीवन साधना गौरव’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.  
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. सिंधूताई विखे पाटील, बेबीलालजी संचेती, ना. स. फरांदे आदिंचाही या पुरस्कारार्थीमध्ये समावेश आहे. १० फेब्रुवारीला (मंगळवार) सकाळी ११ वाजता होणाऱ्या विद्यापीठाच्या वर्धापनदिन सोहळ्यात राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, कोल्हापूरचे शाहू छत्रपती या वेळी उपस्थित राहणार आहेत.
‘विद्यापीठातील बांधकामे नियमबाह्य़ नाहीत’
महापालिकेच्या परवानगीशिवाय विद्यापीठातील इमारतींची बांधकामे झाली असल्याची तक्रार गुरुवारी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली होती. काही इमारतींचे बांधकाम सुरू करण्यासाठी परवानगी घेण्यात आलेली असली, तरी त्यांचे भोगवटा प्रमाणपत्र घेण्यात आलेले नाही, तसेच विद्यापीठात लाखो चौरसफूट बांधकामे होऊन देखील त्यांचा मिळकत कर विद्यापीठाकडून भरला जात नाही,’ असे मुद्देही या तक्रारीत मांडण्यात आले होते. याबाबत कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांना विचारणा केली असता ते म्हणाले, ‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ही शासनाची संस्था असून विद्यापीठातील इमारतींची बांधकामे नियमबाह्य़ नाहीत. बहुतेक इमारतींचा मिळकत करही आम्ही नियमाप्रमाणे भरत आलो आहोत. कोणत्याही नियमाचे उल्लंघन करण्याचा विद्यापीठाचा उद्देश नाही. विद्यापीठातील विविध इमारतींना पालिकेची परवानगी मिळाली असून काही बाबतीत पालिकेकडून काही स्पष्टीकरणे मागितली जातात, त्यामुळे वेळ लागू शकतो.’’
क्रीडा सुविधांसाठी २७ कोटींचा प्रस्ताव
विद्यापीठात अद्ययावत क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी २७ कोटी रुपयांचा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे पाठवला असल्याची माहितीही कुलगुरूंनी दिली. अंतिमत: यूजीसीकडून देशातील पाच विद्यापीठांच्या प्रस्तावांची निवड करण्यात येणार आहे. सध्या विद्यापीठाला यूजीसीने १ कोटी ७० लाखांचे अनुदान देऊ केले आहे. शिवाय क्रीडा मंत्रालयाकडून ५ कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. विद्यापीठाचे क्रीडा सभागृह, क्रीडा साहित्य आणि शूटिंग रेंज यासाठी या निधीचा प्रामुख्याने वापर होणार आहे, असेही ते म्हणाले.