पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रतिष्ठित ‘अन्वेषण २०२५’ या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी संशोधन अधिवेशनात यश मिळवले आहे. त्यात विद्यापीठाला आरोग्य विज्ञान, कृषी विज्ञान या दोन विभागांत पारितोषिके मिळाली असून, सिद्धी जोशी, तनीषा कसबे या विद्यार्थिनींचे आरोग्य विज्ञानासाठीचे संशोधन प्रथम क्रमांकासह प्रतिष्ठेचे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन सुवर्णपदकाचे मानकरी ठरले आहे.

विद्यापीठाने या बाबतची माहिती दिली. भारतीय विद्यापीठ महासंघातर्फे अन्वेषण २०२६ ही स्पर्धा सोलन येथील शूलिनी विद्यापीठात झाली. या स्पर्धेत मूलभूत विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान, आरोग्य विज्ञान आणि संलग्न विषय, कृषी विज्ञान आणि संलग्न क्षेत्रे, समाजशास्त्र, मानव्यविद्या, वाणिज्य व व्यवस्थापन, कायदा, आंतरविद्याशाखीय संशोधन या सहा शाखांचा समावेश होता. त्यात विद्यापीठाला आरोग्य विज्ञान विभागात प्रथम पारितोषिक आणि सुवर्णपदक, कृषी विज्ञान व संलग्न क्षेत्रे या विभागात तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.

सुवर्णपदकासह पारितोषिके पटकावणे हे विद्यापीठात विकसित होत असलेल्या आंतरविद्याशाखीय परिसंस्थेचे द्योतक आहे. विद्यार्थ्यांची कामगिरी अन्य संशोधक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी केलेली कामगिरी विद्यापीठाच्या गुणवत्ता-केंद्रित संशोधन मार्गदर्शनाची परिणामकारकता दर्शवते. विद्यार्थ्यांची मेहनत आणि प्राध्यापकांच्या सक्षम मार्गदर्शनामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे संशोधन प्रत्यक्षात आले आहे, असे अंतर्गत गुणवत्ता सिद्धता कक्षाचे (आयक्यूएससी) संचालक डॉ. विनायक जोशी यांनी नमूद केले.

विद्यापीठाचे शैक्षणिक सामर्थ्य, संशोधन संस्कृती आणि जागतिक दृष्टिकोन या कामगिरीतून अधोरेखित झाला आहे. विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांतून समाजाभिमुख नवोपक्रमाद्वारे आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणामकारक उपाय निर्माण करण्याची क्षमता दिसून येते. संशोधन संस्कृती जोपासण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आयक्यूएसी विभागाच्या प्रयत्नांमुळे विद्यापीठाला यश मिळाले आहे. – डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

काय आहेत संशोधन प्रकल्प?

आरोग्य विज्ञान व संलग्न विषय या विभागात सिद्धी जोशी, तनीषा कसबे यांनी ‘प्रोहील’ हा प्रकल्प सादर केला. मधुमेही जखमांच्या प्रभावी उपचारासाठी प्रोबायोटिक-आधारित बहुउद्देशीय ड्रेसिंग प्रणाली विकसित करण्यावर हा प्रकल्प आधारित आहे. या प्रकल्पाला प्रथम पारितोषिकासह प्रतिष्ठेचे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. या प्रकल्पासाठी एआयएसएसएमएस औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयातील प्रा. राहुल पडाळकर यांनी मार्गदर्शन केले. तर श्रमबचत, कार्यगती आणि उत्पादकता वाढवून शेतीतील मल्चिंग प्रक्रियेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी शिवम देवकर या विद्यार्थ्याने यांत्रिक प्रणालीचा प्रकल्प सादर केला. कृषी विज्ञान आणि संलग्न क्षेत्रे या विभागातील या प्रकल्पाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.