पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या १११ जागांच्या भरतीप्रक्रियेत ऑनलाइन अर्जात शैक्षणिक, संशोधन, अध्यापन (एटीआर) तपशील न भरलेल्या उमेदवारांना विद्यापीठाने आणखी एक संधी दिली आहे. त्यानुसार संबंधित उमेदवारांना एटीआर भरण्यासाठी ५ मेपर्यंत संधी देण्यात आली असून, यामुळे उमेदवारांना त्यांची अपात्रता टाळता येणार आहे.

विद्यापीठाने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. विद्यापीठातील प्राध्यापक भरतीप्रक्रियेसाठी सुमारे नऊ हजार उमेदवारांनी अर्ज केला आहे. मात्र, अनेक उमेदवारांनी ‘एटीआर’ तपशील भरला नसल्याचे निदर्शनास आले आहे. परिणामी, संबंधित उमेदवार भरतीप्रक्रियेत अपात्र ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘एटीआर’ न भरलेल्या उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. मात्र, वाढीव मुदतीमध्ये उमेदवारांना नव्याने अर्ज करता येणार नाही.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध शैक्षणिक विभागांमधील शासनमान्य प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक या संवर्गातील रिक्त एकूण १११ शिक्षकीय पदांच्या भरतीकरिता जाहिरात १३ सप्टेंबर, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. तसेच, त्याबाबत वेळोवेळी शुद्धिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले होते. या जाहिरातीनुसार सर्व उमेदवारांनी शैक्षणिक संशोधन तपशील (यापूर्वीचा एटीआर ६० गुण) आणि लागू असल्यास किमान १२०/७५ गुणांचा रीसर्च स्कोअर (एपीआय) संबंधित आवश्यक त्या कागदपत्रांसह जमा करणे अनिवार्य आहे.

मात्र, अनेक उमेदवारांनी याची पूर्तता केली नसल्याने त्यांची उमेदवारी रद्द होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे सर्व मूळ उमेदवारांना त्यांच्या अर्जामध्ये ऑनलाइन बदल, सुधारणा करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात येत आहे. त्यानुसार उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या अर्जामध्ये ५ मेपर्यंत बदल करावेत. अर्जात बदल, सुधारणा केलेल्या उमेदवारांनी अर्जाची सुधारित प्रत, एटीआर, एपीआयची प्रत संबंधित आवश्यक त्या कागदपत्रांसह विद्यापीठ कार्यालयातील प्रशासन शिक्षक कक्षाकडे ९ मेपर्यंत सादर करणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

प्राध्यापकभरती जूनपर्यंत पूर्ण होण्याबाबत साशंकता

प्राध्यापकभरतीसाठी विद्यापीठ अनुदान आयोगाची नियमावली असतानाही उच्च व तंत्रशिक्षण विभागाने शैक्षणिक, संशोधन कामगिरीसाठी ६०, मुलाखतीसाठी २०, अध्यापनासाठी २० गुण असे सूत्र निश्चित केले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह सर्व सार्वजनिक विद्यापीठांना प्राध्यापक भरतीप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जूनपर्यंतची मुदत दिली आहे. मात्र, उमेदवारांच्या अर्जांची छाननी, मुलाखत ही प्रक्रिया या मुदतीत पूर्ण होण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जूनपर्यंत खरोखरच भरतीप्रक्रिया पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.