पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील प्रस्तावित डबल डेकर उड्डाणपूल आणि माण-हिंजवडी मेट्रो मार्गिकेच्या कामांना गती मिळाली आहे. दुमजली उड्डाणपूल येत्या काही दिवसांमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार असून कामे तातडीने पूर्ण करण्याची सूचना पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) संबंधित कंपनीला केली आहे. त्यामुळे वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे.
विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गिकेच्या कामांची पाहणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डाॅ. योगेश म्हसे यांनी केली. अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी गुरुवारी केली. या पाहणीवेळी पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण, पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड (पीआयटीसीएमआरएल)चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल सैनी, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, संबंधित कंत्राटदार कंपन्यांचे प्रतिनिधी, तसेच पीएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पुणेकरांची वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, विद्यापीठ चौकातील डबल डेकर पूल शक्य तितक्या लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याचे करण्याचे नियोजन असल्याचे डाॅ. म्हसे यांनी यावेळी स्पष्ट केले. डबल डेकर पुलाच्या बाणेर रॅम्पचे काम अतिरिक्त मनुष्यबळ आणि संसाधनांचा वापर करून वेगाने पूर्ण करण्याची सूचनाही त्यांनी टाटा प्रोजेक्ट्स लिमिटेडच्या अधिकाऱ्यांना केली. तसेच, पाषाण बाजूकडील रॅम्पच्या कामात अडथळा ठरणाऱ्या पाण्याच्या गळतीची समस्या युद्धपातळीवर सोडवण्याच्या सूचना पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली.
दरम्यान, माण–हिंजवडी मेट्रो (लाईन-३) प्रकल्पाचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. मेट्रो स्थानकांशी संबंधित तांत्रिक अडचणींवर चर्चा करून त्यावर तातडीच्या उपाययोजना सुचवण्यात आल्या. विशेषतः शिवाजीनगर स्थानक, मोदीबाग आणि विद्यापीठ चौक येथील पादचारी पुलांच्या (फूट ओव्हर ब्रिज) कामाची सद्य:स्थिती तपासण्यात आली. मेट्रो मार्गिकेवरील कामाचा दर्जा राखून प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर दिला आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे शहरातील वाहतूक अधिक सुलभ व गतिमान होईल, असा विश्वास डाॅ. म्हसे यांनी व्यक्त केला.
