पुणे : गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषीजी महाराज चौकातील (विद्यापीठ चौक) उड्डाणपूल मंगळवारपर्यंत (१७ फेब्रुवारी) सुरू करण्यात येणार होता. मात्र, क्षमता चाचणी, रंगरंगोटी, राडारोडा साफ करणे इत्यादी किरकोळ कामे रखडल्याने या उड्डाणपुलाचे लोकार्पण लांबणीवर पडले आहे. दरम्यान, याच पुलावर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू असून, येत्या दोन-तीन महिन्यांत हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो धावणार असल्याचे आश्वासन ‘पीएमआरडीए’चे आयुक्त योगेश म्हसे यांनी दिले आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी शनिवारी (१४ फेब्रुवारी) सरहद संस्थेच्या कार्यक्रमात विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल तीन दिवसांत खुला करणार असल्याची माहिती दिली होती. कोणताही औपचारिक कार्यक्रम आयोजित न करता हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले होते. मात्र, तीन दिवस उलटूनही हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही.
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी उड्डाणपुलाच्या संरचनात्मक लेखापरीक्षणाची मागणी केली. तसेच, उड्डाणपुलावर पडलेला राडारोडा उचलण्यात आलेला नाही, रंगरंगोटीची कामेही प्रलंबित आहेत. त्यामुळे हा पूल येत्या काही दिवसांमध्ये वाहतुकीसाठी खुला होणार का, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाची एक बाजू खुली करण्यात आल्याने बाणेरकडून शिवाजीनगरकडे जाणारी वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र, उड्डाणपुलाचे लोकार्पण लांबणीवर गेल्याने शिवाजीनगरकडून पाषाणकडे जाणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
विद्यापीठ चौकातील पुलावर हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आले असून, येत्या दोन-तीन महिन्यांत मेट्रोही सुरू करण्याचे आश्वासन ‘पीएमआरडीए’चे आयुक्त योगेश म्हसे यांनी दिले आहे.
प्रशासनाची बाजू काय ?
‘विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाची क्षमता चाचणी, रंगरंगोटी, राडारोडा साफ करणे आदी किरकोळ कामांना वेळ लागतो आहे. सर्व प्रकारची कामे पूर्ण करून, हा उड्डाणपूल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे,’ असे पीएमआरडीएच्या मुख्य अभियंता रिनाज पठाण यांनी सांगितले.

