पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या हिवाळी सत्र परीक्षांचे काम वेळेवर, पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने नियोजन सुरू केले आहे. त्यानुसार परीक्षांच्या नियोजनादरम्यान प्राश्निक, परीक्षक, नियामक, बहिःस्थ वरिष्ठ पर्यवेक्षक किंवा भरारी पथकावर नेमणूक होऊनही त्या बाबत कामकाज न केल्यास प्राध्यापकांवर, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाईचा इशारा विद्यापीठाच्या विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने दिला आहे.

परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी अहिल्यानगर, नाशिक व पुणे जिल्ह्यातील सर्व संलग्न महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त संस्थांचे प्राचार्य, संस्थाचालकांना परिपत्रकाद्वारे सूचना दिल्या आहेत. यापूर्वी परीक्षांच्या काळात अनेक प्राध्यापक काही कारणांनी हजर होत नसल्याचे निदर्शास आले आहे. त्यामुळे परीक्षाविषयक कामकाज, नियोजनात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील तरतुदींचा संदर्भ देऊन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापनाशी संबंधित कामांमध्ये मदत करणे हे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच, या बाबत विद्यापीठाच्या, महाविद्यालयाच्या किंवा परिसंस्थेच्या आदेशाचे अनुपालन करण्यात कर्मचाऱ्याने कसूर केल्यास ती गैरवर्तणूक समजण्यात येईल आणि संबंधित कर्मचारी शिस्तभंगविषयक कारवाईसाठी पात्र असेल. त्याशिवाय, संबंधित प्राध्यापक, कर्मचाऱ्याच्या नियुक्तीच्या मान्यतेला स्थगिती देण्यासह कडक दंड ठोठावण्याचा पूर्ण अधिकार कुलगुरूंना आहे, याकडेही परीक्षा विभागाने लक्ष वेधले आहे.

विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे कामकाज संलग्न महाविद्यालये, मान्यताप्राप्त परिसंस्थांचे प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी यांच्या सक्रिय सहभागामुळेच व्यवस्थित पार पडतात. त्यामुळे परीक्षेच्या कामकाजात संबंधित सर्व घटकांचे सहकार्य आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

पाच सदस्यांच्या समितीद्वारे चौकशी

‘परीक्षापूर्व किंवा परीक्षेनंतरच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यापीठाच्या आदेशाचे अनुपालन न केल्याबद्दल, चुकांबाबत चौकशी वा शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी पाच सदस्यांची विशेष समिती नियुक्त करण्यात येणार आहे. या समितीकडून चौकशी करून कुलगुरूंना अहवाल सादर करण्यात येईल. कुलगुरूंच्या निर्देशानुसार परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक दोषींवर शिस्तभंगाच्या कारवाईची अंमलबजावणी करतील. त्यामुळे आगामी हिवाळी सत्राच्या परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी ज्या प्राध्यापकांची परीक्षा कामासाठी निवड झाली आहे, त्यांना तत्काळ कार्यमुक्त करावे,’ असे स्पष्ट करण्यात आले आहे.