पुणे : राज्यातील दुष्काळी स्थितीच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने भोजनगृहाची प्रस्तावित दरवाढ तत्काळ रद्द करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेतला आहे. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क आगामी परीक्षेत माफ करण्यात येणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी ही माहिती दिली. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक शनिवारी झाली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांच्या समस्यांना केंद्रस्थानी मानून विद्यार्थी केंद्रित महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
काही दिवसांपूर्वी विद्यापीठाने भोजनगृहातील जेवणाचे दर दहा रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या चार-पाच वर्षांमध्ये दरवाढ झाली नसल्याचे, तसेच महागाई झाल्याचे कारण विद्यापीठ प्रशासनाने दिले होते. मात्र, या दरवाढीला विद्यार्थी संघटनांनी तीव्र विरोध केला होता. राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून तातडीने दरवाढ रद्द करण्याची मागणी विद्यार्थी संघटनांकडून करण्यात आली होती. या अनुषंगाने प्रस्तावित दरवाढ रद्द करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला. विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील तीनही जिल्ह्यांतील दुष्काळग्रस्त तालुक्यांतून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे परीक्षा शुल्क आगामी परीक्षेत माफ करण्याचा निर्णय राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे घेण्यात यावा, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.
भोजनगृहाची दहा रुपयांची दरवाढ रद्द करताना गरजू विद्यार्थ्यांच्या भोजनाची गुणवत्ता राखण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. ज्योत्स्ना एकबोटे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्यात आली. प्रा. संगीता जगताप या समितीच्या सदस्य असतील. विद्यापीठात कार्यरत असलेल्या भोजनगृह गुणवत्ता नियंत्रण समितीसारख्या सर्व समित्या नव्याने नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. समित्यांच्या कामकाजाची कार्यकक्षा आणि जबाबदारी ठरवण्यासाठी डॉ. एकबोटे यांच्या समितीद्वारे निकष ठरवण्यात येणार आहेत.
