पुणे विद्यापीठाच्या परीक्षा बहुपर्यायी, ऑनलाइन!

प्रथम वर्षांची परीक्षा ३० मार्चपासून, अन्य वर्षांची परीक्षा २० मार्चपासून

(संग्रहित छायाचित्र)

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सत्र परीक्षा बहुपर्यायी आणि ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. प्रथम वर्षांची परीक्षा ३० मार्चपासून, तर अन्य वर्षांची परीक्षा २० मार्चपासून सुरू होईल. अंतिम वर्षांच्या परीक्षेत बहुपर्यायी प्रश्नांसह चार प्रश्न दीघरेत्तरी स्वरुपाचे असतील, असा निर्णय विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला.

विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेबाबत चर्चा करून निर्णय घेण्यात आला. विद्यार्थी आणि संघटनांनी परीक्षा ऑनलाइन पद्धतीनेच घेण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. अंतिम वर्ष वगळता इतर वर्षांच्या  विद्यार्थ्यांना मोबाइल, लॅपटॉप, टॅब, संगणकाद्वारे परीक्षा देता येईल. अंतिम वर्षांची परीक्षा ७० गुणांची आणि दीड तासांची असेल. त्यात ५० गुणांचे बहुपर्यायी प्रश्न, तर २० गुणांचे दीघरेत्तर प्रश्न विचारले जातील. इतर सर्व वर्षांच्या परीक्षा ५० गुणांच्या बहुर्यायी पद्धतीने, एक तासाच्या होतील. करोनाच्या प्रादुर्वाभामुळे बीए, बीकॉम, बीएस्सी अशा बिगरव्यावसायिक पारंपरिक अभ्यासक्रमांचे ऑनलाइन शैक्षणिक वर्ष वेळेत सुरू  झाल्याने, त्यांच्या परीक्षा १०० टक्के  अभ्यासक्रमावर होतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांवर परीक्षेदरम्यान निगराणी

विद्यापीठाच्या सत्र परीक्षांदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी निगराणी के ली जाणार आहे. त्यासाठी प्रॉक्टर्ड पद्धत वापरली जाणार आहे. विद्यार्थ्यांवर परीक्षा साधनातील (स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप, संगणक)  कॅमेऱ्याच्या माध्यमातून लक्ष ठेवले जाईल. परीक्षेदरम्यान गैरप्रकार होत असल्यास पाचवेळा सूचना दिल्या जातील. त्यानंतरही गैरप्रकार झाल्यास संबंधित विद्यार्थ्यांला कारवाईला सामोरे जावे लागेल.

उपसमितीची स्थापना

अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षांतील कामगिरी शैक्षणिकदृष्टय़ा महत्त्वाची असते. त्यामुळे अंतिम वर्षांच्या परीक्षा महाविद्यालयात होण्याची शक्यता आहे. या परीक्षांची पद्धत ठरवण्यासाठी उपसमितीची स्थापना केली आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वास्तुकला, हॉटेल मॅनेजमेंट आदी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया संपली आहे, तर विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया काही दिवसांत पूर्ण होईल. त्यामुळे अंतिम वर्षांसह अन्य वर्षांच्या परीक्षांसाठी पूर्ण अभ्यासक्रम असावा की अभ्यासक्रम कमी करावा हे ठरवण्यासाठी डॉ. संजय चाकणे यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती अभ्यास करणार आहे. उपसमितीने अहवाल दिल्यानंतर परीक्षांचे वेळापत्रक जाहीर के ले जाईल, असे डॉ. काकडे यांनी स्पष्ट केले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Pune university exam multiple choice online abn