पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शनिवारी (३१ ऑक्टोबर) होणाऱ्या विविध विषयांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्याचे ध्वजारोहण कार्यक्रमासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीवर परिणाम होण्याच्या शक्यतेमुळे विद्यापीठाने परीक्षेचे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय घेतला असून, आता ३१ ऑक्टोबर रोजीच्या परीक्षा २६ नोव्हेंबर रोजी आयोजित केल्या जाणार आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी याबाबतची परिपत्रकाद्वारे माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यक्षेत्राती पुणे, अहिल्यानगर, नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयांमध्ये विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. त्यानुसार ३१ ऑक्टोबर रोजीही विविध विषयांच्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, आता अचानकपणे या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
‘सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती नाशिक दौऱ्यावर येत असल्याने वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचे नाशिक महापालिका आयुक्तांनी पत्राद्वारे कळवले आहे. यांचा दौरा असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३१ ऑक्टोबर रोजीच्या परीक्षा रद्द करण्यात येत असून, ३१ ऑक्टोबर रोजीच्या सर्व परीक्षा २६ नोव्हेंबर रोजी पूर्वनियोजित वेळेप्रमाणे निश्चित करण्यात येत आहेत, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.
दरम्यान, परीक्षेच्या केवळ एक दिवस आधी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. त्यामुळे आयत्यावेळी विद्यार्थ्यांपर्यंत परीक्षा वेळापत्रकातील बदलासंदर्भातील माहिती कळवावी लागणार आहे. विद्यापीठाने या बाबत आधीच निर्णय घेणे आवश्यक होते. त्यामुळे गोंधळ टळू शकला असता, असे काही प्राचार्यांनी सांगितले.
