पुणे विद्यापीठात गेल्या वर्षी वादग्रस्त ठरलेल्या बहि:स्थ अभ्यासक्रमाऐवजी दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार असल्याचे विद्यापीठाने जाहीर केले. मात्र, दूरशिक्षण हे विद्यापीठासाठी अजून काही काळ दूरच राहणार आहे. त्यामुळे बहि:स्थ अभ्यासक्रम सुरूही ठेवता येत नाही आणि बंदही करता येत नाही अशा परिस्थितीत रेटावा लागणार आहे.
राज्यात फक्त पुणे विद्यापीठ बहि:स्थ अभ्यासक्रम चालवते. गेली काही वर्षे नियमित अभ्यासक्रमांपेक्षा बहि:स्थ अभ्यासक्रमांनाच गर्दी होत होती. मात्र, त्याचवेळी बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. त्या पाश्र्वभूमीवर गेल्यावर्षी पुणे विद्यापीठाने बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे निकष बदलले. त्याचवेळी पुढील वर्षांपासून विद्यापीठात दूरशिक्षण सुरू करण्याचे विद्यापीठाने जाहीर केले होते. बहि:स्थ अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक विषयाचे विशेष वर्ग घेण्याचेही जाहीर केले होते. मात्र, यातील काहीच प्रत्यक्षात उतरले नाही. या वर्षीही विद्यापीठात बहि:स्थ अभ्यासक्रमच चालवला जाणार आहे. त्याचप्रमाणे बहि:स्थ अभ्यासक्राला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लागणारे अभ्यास साहित्यही अद्याप तयार झालेलेच नाही. त्यामुळे यावर्षीही बहि:स्थ अभ्यासक्रम रडत खडतच चालण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षी पुणे विद्यापीठाने दूरशिक्षण सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवले. मात्र, दूरशिक्षणाबाबत केंद्राच्या धोरणामध्येच अस्थिरता होती. सुरुवातीला ‘डिस्टन्स एज्युकेशन काऊन्सिल’कडे दूरस्थ शिक्षणाबाबत निर्णय घेण्याचे आणि निकष ठरवण्याचे अधिकार होते. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाकडे दूरस्थ शिक्षणाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले. दूरशिक्षणासाठी लागणारे अभ्यास साहित्य, केंद्र सुरू करण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा याबाबत आयोगाने विचारणा केल्यानंतर विद्यापीठाला जाग आली. या सगळ्या गोंधळामध्ये पुणे विद्यापाठाचे दूरशिक्षण केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मंजूर झालाच नाही. त्यामुळे या वर्षीही बहि:स्थ अभ्यासक्रम सुरू ठेवण्याशिवाय विद्यापीठाला पर्याय राहिला नाही.
बहि:स्थ अभ्यासक्रमाची गुणवत्ता राखण्यासाठी मार्गदर्शन वर्ग सुरू करण्याचे आणि या विद्यार्थ्यांसाठी विशेष अभ्यास साहित्य निर्माण करण्याची घोषणा विद्यापीठाने गेल्या वर्षी केली होती. अभ्यास साहित्य निर्माण करण्याची जबाबदारीही अधिष्ठात्यांवर देण्यात आली होती. मात्र, यातले काहीही गेल्या वर्षी प्रत्यक्षात उतरले नाही. या वर्षीही बहि:स्थ अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी अद्यापही अभ्यास साहित्य तयार करण्यात आलेले नाही. त्यामुळे यावर्षीही बहि:स्थ अभ्यासक्रम रडत खडतच रेटला जाणार आहे.
‘‘दूरशिक्षण सुरू करण्यासाठी विद्यापीठाने तीन वेळा प्रस्ताव पाठवला. मात्र, दूरशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या निकषांबाबत केंद्रीय संस्थांमध्येच गोंधळ असल्याने विद्यापीठाचा प्रस्ताव रखडला आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने दूरशिक्षणातही मूल्यांकनासाठी क्रेडिट सिस्टिम लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगाने अभ्यासक्रमाच्या निर्मितीचे काम सध्या सुरू आहे. मात्र, दूरशिक्षण अभ्यासक्रम सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी बहि:स्थ अभ्यासक्रमच सुरू ठेवण्यात आला आहे.’’
– नंदकुमार निकम, (बहि:स्थ अभ्यासक्रमाबाबत नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष)
बहि:स्थची प्रवेश प्रक्रिया सुरू
पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला (एफ.वाय. बीए), वाणिज्य (एफ.वाय. बी.कॉम), पदव्युत्तर कला (एम.ए.), पदव्युत्तर वाणिज्य (एम.कॉम.) या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या अभ्यासक्रमांचे प्रवेश अर्ज भरण्यासाठी २० ऑगस्टपर्यंत मुदत आहे. प्रवेशासाठीचे निकष आणि अधिक माहिती विद्यापीठाच्या http://www.unipune.ac.in/externalया संकेतस्थळावर उपलब्ध आहे.