पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कर्मचाऱ्याने पैसे घेऊन विद्यार्थ्याला बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र देण्याच्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन विद्यापीठाने संबंधित कर्मचारी रमेश दामोदर मुखेकर यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. या गैरव्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास करण्यासाठी विद्यापीठातर्फे चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती दिली. विद्यापीठातील कर्मचाऱ्याने विद्यापीठाच्या नावे बीकॉम अभ्यासक्रमाची गुणपत्रके, पदवी प्रमाणपत्र मिळवून देण्याचे आमिष दाखवून प्रमाणपत्रांची छायाचित्रे दिल्याचा व त्या बदल्यात ७० हजार रुपये घेतल्याचा प्रकार संबंधित विद्यार्थ्याच्या रिक्षाचालक पालकाने केलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आला.

‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील कर्मचारी रमेश मुखेकर यांनी साहिल महेश कदम या विद्यार्थ्यास विद्यापीठाच्या बी. कॉम. या अभ्यासक्रमाचे गुणपत्रक आणि पदवी प्रमाणपत्र मिळवून देतो, असे सांगून विद्यार्थ्याकडून ७० हजार रुपये गुगल पेद्वारे स्वीकारून संगणकाद्वारे तयार केलेल्या, मूळ कागदपत्रांसारखी दिसणारी छायाचित्रे व्हॉट्सॲपद्वारे दिल्याची तक्रार विद्यापीठाला प्राप्त झाली. संबंधित कर्मचारी हा विद्यापीठाच्या परीक्षा विभागात कार्यरत नाही. त्याने व्हॉट्सॲपवर तयार करून दिलेली कागदपत्रे परीक्षा विभागाच्या अभिलेखांशी सुसंगत नाहीत, असे निदर्शनास आले. तसेच, मुखेकर यांनी पैसे स्वीकारून या कृत्यात सहभाग घेतल्याचे दिसून येते. विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुखेकर यांना तत्काळ प्रभावाने विद्यापीठ सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता सखोल तपासाच्या दृष्टीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. राजेंद्र तलवारे यांनी चतु:श्रुंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस तपासात ज्यांचा या गैरकृत्यात सहभाग आढळून येईल, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. हा गैरप्रकार मुखेकर यांनी परीक्षा विभागाशी संबंधित नसताना, तसेच परीक्षा विभागाच्या व्यवस्थेबाबतचे त्यांचे ज्ञान वापरून केला असल्याचे निदर्शनास आले आहे. यात व्यवस्थेतील इतर कोणाचा सहभाग आहे का, ही बाब पोलीस तपासात स्पष्ट होईल,’ असे डॉ. पवार यांनी नमूद केले आहे.

‘प्रमाणपत्रांमध्ये उच्च दर्जाच्या सुरक्षा मानकांचा समावेश’

‘विद्यापीठाकडून जारी करण्यात येणाऱ्या परीक्षेच्या गुणपत्रिका, पदवी प्रमाणपत्रांमध्ये उच्च दर्जाच्या सुरक्षा मानकांचा समावेश केलेला असतो. त्यामुळे कोणतीही आमिषे, अफवांवर पालक, विद्यार्थ्यांनी विश्वास ठेवू नये,’ असे आवाहनही करण्यात आले.