पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्याची बनावट बी. कॉम. पदवी, गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र तयार करून त्याबदल्यात ७० हजार रुपये स्वीकारल्याच्या आरोपावरून विद्यापीठातील कर्मचारी रमेश दामोदर मुखेकर (वय ४८) याला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता आरोपीला ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागातील कर्मचारी असून परीक्षा विभागात कार्यरत आहे. त्याने विद्यापीठातील एका विद्यार्थ्याच्या वडिलांना त्यांचा मुलगा बी. कॉम. पदवीधर झाल्याचे भासवून बनावट गुणपत्रिका आणि पदवी प्रमाणपत्र तयार करून दिले. ही कागदपत्रे खरी असल्याचे भासवून आरोपीने संबंधितांकडून ७० हजार रुपये ‘गुगल-पे’च्या माध्यमातून स्वीकारल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणात आरोपीने बनावट कागदपत्रे तयार करण्यासाठी कोणत्या साधनांचा आणि ठिकाणांचा वापर केला, याचा तपास पोलिसांना करायचा आहे. तसेच त्याने अशाच प्रकारे आणखी किती विद्यार्थ्यांची बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केली आहे, याचाही तपास सुरू आहे.पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपीने बनावट पदवी प्रमाणपत्र, गुणपत्रिका तयार केल्याचे नमूद आहे. ही कागदपत्रे तयार करण्यासाठी वापरलेली साधने हस्तगत करणे तसेच आरोपीच्या मोबाईलमधील माहिती तपासणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले.
विशेष म्हणजे, आरोपीने बनावट कागदपत्रे देऊन ती खरी असल्याचे भासविल्यानंतर संबंधित व्यक्तीकडून ७० हजार रुपये घेतले. ही रक्कम गुगल-पेवरून स्वीकारण्यात आली असून, संबंधित बँक खात्याची माहितीही पोलिसांकडून घेतली जाणार आहे.तपासादरम्यान आरोपीने साक्षीदारांवर दबाव आणण्याची, त्यांना धमकावण्याची किंवा प्रलोभन देऊन तपासी अधिकाऱ्यांसमोर अथवा न्यायालयात जबाब व साक्ष देऊ नये, असा प्रयत्न करण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तसेच गुन्ह्याच्या तपासासाठी आरोपीची पोलीस कोठडी आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले.
आरोपीचे पूर्वीचे रेकॉर्ड काय आहे, याचीही चौकशी केली जाणार आहे. बनावट कागदपत्रांच्या माध्यमातून विद्यापीठाशी संबंधित आणखी काही विद्यार्थ्यांची फसवणूक झाली आहे का, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
