पुणे : ‘बहुप्रतीक्षित हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो आणि आचार्य आनंदऋषीजी चौकातील दुमजली उड्डाणपुलाचे संरचनात्मक कामे उच्च दर्जाची आणि व्यवस्थित झाली आहेत. मात्र, किरकोळ कामांमध्ये त्रुटी आणि उर्वरित कामे प्रलंबित असल्याने याबाबत तातडीने कार्यवाही करून दुरुस्ती करावी,’ असे आदेश पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ‘टाटा सिमेन्स’ कंपनीला दिले आहेत. दरम्यान, ही कामे झाल्यानंतरच दुहेरी उड्डाणपुलाची दुसरी बाजू सुरू करण्याबाबतचे निर्देश पत्राद्वारे दिले आहेत.

हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पांतर्गत आचार्य आनंदऋषीजी (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रवेशद्वार) चौकात दुमजली उड्डाणपूल प्रस्तावित आहे. औंध ते शिवाजीनगर दिशेने येणाऱ्या बाजूचे काम पूर्ण झाल्याने गेल्या वर्षी २० ऑगस्टला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, तर तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन करून ही बाजू खुली करण्यात आली.

बाणेरकडील बाजूही वाहतुकीसाठी सुरू करण्यात येणार असताना आणि मेट्रो मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात असताना अनेक ठिकाणी असुरक्षित साहित्य, राडारोडा,अयोग्यरित्या साठवलेली उपकरणे, अनावश्यक लोखंडी अडथळे अद्याप पुलाखाली पडून आहे. यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्याबरोबरच प्रवाशांना इजा, अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याने आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी या पुलाच्या कामाचे स्थापत्य लेखापरीक्षण आणि सुरक्षात्मक लेखापरीक्षण करावे, असे पत्र ‘पीएमआरडीए’ला पाठवले होते.

या पार्श्वभूमीवर ‘पीएमआरडीए’ने टाटा सिमेन्स कंपनीला पत्र पाठवून मेट्रो आणि उड्डाणपुलाची कामे तातडीने पूर्ण करून किरकोळ कामांच्या ठिकाणी असलेल्या दुरुस्ती करून घ्यावी, असे पत्र पाठवून निर्देश दिले आहेत.

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्ग, स्थानके आणि दुहेरी उड्डाणपूल यांची कामे सुरू असून संरचनात्मक कामे व्यवस्थित झाली आहेत. किरकोळ कामांबाबत काहीशा त्रुटी असून, त्यांच्या दुरुस्तीसाठी टाटा सिमेन्स कंपनीला पत्र पाठविले आहे. ही किरकोळ कामे वेळेत पूर्ण करण्यात येतील.
– रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए