पुणे विद्यापीठाकडे आता युके, ब्राझिल आणि युरोपातील इतर देशांमधील विद्यार्थीही आकर्षित झाले आहेत. यावर्षी साधारण दिडशे परदेशी विद्यार्थ्यांनी पीएच.डी. करण्यासाठी विद्यापीठामध्ये अर्ज केले आहेत.
पुणे विद्यापीठाला आता परदेशी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढू लागला आहे. पुणे विद्यापीठामध्ये आतापर्यंत प्रमुख्याने मध्यआशिया, आफ्रिका खंडातील देशांमधून विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत होते. मात्र, आता युरोपियन देशांतील विद्यार्थीही पुणे विद्यापीठाकडे वळत आहेत. यावर्षी पीएच.डी.साठी परदेशी विद्यार्थ्यांचे दिडशे अर्ज विद्यापीठामध्ये आले होते. त्यापैकी १०४ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले. त्यामध्ये ब्राझील, युके या देशांमधूनही विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत अशी माहिती विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांनी दिली.
गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यावर्षी पीएच.डी.साठी परदेशी विद्यार्थ्यांचा प्रतिसादही वाढला आहे. गेल्यावर्षी परदेशी विद्यार्थ्यांकडून फक्त ८ ते १० अर्ज आले होते. त्यामधील एकच विद्यार्थी पात्र ठरला होता. मात्र यावर्षी अर्जाच्या संख्येमध्ये दहापटींनी वाढ झाली आहे. सामाजिक शास्त्रांमध्ये अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांचे पुणे विद्यापीठाला प्राधान्य असल्याचे दिसत आहे. यावर्षी विद्यापीठाने परदेशी विद्यार्थ्यांसाठी पीएच.डी.साठी स्वतंत्रपणे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढला आहे, असेही खरे यांनी सांगितले. परदेशी विद्यार्थ्यांच्या संख्या हा विद्यापीठांच्या मानांकनामधील एक निकष आहे. परदेशी विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या प्रतिसादाचा मानांकन सुधारण्यासाठी फायदा होईल, असे विद्यापीठातील तज्ज्ञांचे मत आहे. परदेशी विद्यार्थ्यांची १६ तारखेला प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.