पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कामकाजात राजकीय आणि संघटनात्मक हस्तक्षेप वारंवार मोठ्या प्रमाणात होत असल्याचा गंभीर आरोप विद्यापीठातील प्राध्यापकांच्या संघटनेने केला आहे. विद्यापीठाचे प्रशासन कुलगुरू चालवत आहेत, की राजकीय दबाव गट असा गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला असून, अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडताना अपमान, मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, राजकीय हस्तक्षेपाला बळी पडण्याचा प्रश्नच येत नसून, सर्व घटकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय प्रक्रिया राबवावी लागत असल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

विद्यापीठातील सावित्रीबाई फुले शिक्षक संघटनेने या बाबत कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना निवेदन दिले. विद्यापीठात प्राध्यापकांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. प्राध्यापक भरती प्रक्रिया तीन वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे प्राध्यापकांना नियमित कामकाजासह अतिरिक्त जबाबदाऱ्या पेलाव्या लागत आहेत. एका प्राध्यापकाकडे दोन-तीन पदांचे काम असल्याची स्थिती आहे. या पार्श्वभूमीवर संघटनेने प्राध्यापकांना करावे लागणारे अतिरिक्त काम, त्यातील अडचणी मांडून राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा अधोरेखित केला आहे.

‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशातील अग्रगण्य विद्यापीठ आहे. या विद्यापीठाची शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्यपद्धती ही शास्त्रीय, शैक्षणिकदृष्ट्या प्रभावी राहिली आहे. परंतु, सध्याच्या अपरिहार्य परिस्थितीत या परंपरेला क्षती पोहोचत आहे. विद्यापीठात प्राध्यापकांना अतिरिक्त कार्यभार दिला जातो, अधिकच्या जबाबदाऱ्याही दिल्या जातात. मात्र, त्यांना त्या पदावर कार्य करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा बिकट परिस्थितीत राजकीय आणि संघटनात्मक हस्तक्षेप वारंवार मोठ्या प्रमाणात होत आहे. अशा प्रसंगी प्रशासनाची भूमिका मात्र प्राध्यापकांच्या बाजूने ठामपणे दिसून येत नाही. प्राध्यापकांनी अधिकच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या आणि अखेर अपमान, मानसिक त्रासही सहन करायचा, ही कोणती प्रशासकीय नीती निर्माण केली जात आहे, विद्यापीठीय प्रशासन कुलगुरू चालवत आहेत, की राजकीय दबाव गट चालवत आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे,’ असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सामूहिक आंदोलनाचा इशारा

‘वास्तवाचे भान न ठेवता राजकीय दबावाला बळी पडून बेजबाबदार विधाने प्रशासनामार्फत वृत्तपत्र आणि माध्यमांत दिली जात आहेत. या कार्यनीतीचा आम्ही प्राध्यापक निषेध करीत आहोत. तसेच, विद्यापीठ प्रशासन राजकीय दबावगटांना बळी पडून निर्णय घेणार असल्यास प्राध्यापक विद्यापीठ इमारतीसमोर सामूहिक वाचन आंदोलन करतील,’ असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला.

राजकीय हस्तक्षेपाला बळी पडण्याचा प्रश्नच येत नाही. सर्व घटकांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून निर्णय प्रक्रिया राबवावी लागते. – डॉ. सुरेश गोसावी, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ