पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरातील मध्यवर्ती भोजनगृह (रिफेक्टरी) चालविणाऱ्या मे. श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेस या आस्थापनेचा अन्न परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा विभागाच्या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी आणि अन्न सुरक्षिततेला बाधा आणणाऱ्या अनियमितता आढळून आल्याने ही कारवाई करण्यात आली.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी १६ जून २०२६ रोजी भोजनगृहाची तपासणी केली असता अन्न साठवणूक, तापमान नियंत्रण, स्वच्छता आणि अन्न हाताळणीच्या प्रक्रियेमध्ये गंभीर त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. तपासणीदरम्यान कच्चे आणि शिजवलेले अन्न वेगळे ठेवण्याबाबत आवश्यक खबरदारी घेतली जात नसल्याचे आढळले. तसेच अन्नपदार्थांच्या सुरक्षित साठवणुकीसाठी आवश्यक तापमान नियंत्रणाची प्रभावी व्यवस्था नसल्याचेही स्पष्ट झाले.

याशिवाय भोजनगृहात कीटक प्रतिबंधक उपाययोजनांचा अभाव, अपुरी स्वच्छता व्यवस्था, कीटक नियंत्रणातील त्रुटी, पाण्याच्या गुणवत्तेबाबत आवश्यक अभिलेख उपलब्ध नसणे आणि अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणीचे नोंदवही अभिलेख नसणे अशा अनेक बाबी आढळून आल्या. या सर्व त्रुटींमुळे अन्नाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ग्राहकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, या भोजनगृहाबाबत समाजमाध्यमांवरूनही विविध तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत अन्न सुरक्षा विभागाने प्रत्यक्ष तपासणी केली. तपासणीत समोर आलेल्या अनियमिततांचे स्वरूप आणि गांभीर्य लक्षात घेता सदर आस्थापना सुरू राहणे हे जनआरोग्याच्या दृष्टीने धोकादायक ठरू शकते, असा निष्कर्ष अधिकाऱ्यांनी नोंदविला आहे.

अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायिकांचे परवाने व नोंदणी) विनियम, २०११ मधील विनियम २.१.८(४) अंतर्गत मे. श्री स्वामी समर्थ भोजनालय अँड केटरिंग सर्व्हिसेस यांचा अन्न नोंदणी क्रमांक २१५२६०३५००२२२७ पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. संबंधित आस्थापनेने आवश्यक सुधारणा करून अन्न सुरक्षा नियमांचे पालन केल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन सुत्रांनी सांगितले.
गेल्या काही दिवसांपासुन पुणे विद्यापीठाच्या मेसमधील अन्नात झुरळे, अळ्या आढळल्या असल्याच्या बातम्या योत होत्या. तसेच अस्वच्छता, शिळे अन्न दिले जात असल्याबद्दल विद्यापीठ आवारीतील मेसमधील विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त करत तक्रार केली होती. याविरोधात आंदोलनही करण्यात आले होते.

विद्यापीठ परिसरात दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी भोजनगृहाचा वापर करतात. त्यामुळे अन्न सुरक्षिततेच्या नियमांचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक असून या कारवाईमुळे विद्यापीठातील खाद्यसेवा व्यवस्थेच्या गुणवत्तेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.