पुणे : राज्य मंडळाने बारावीचा निकाल जाहीर केल्यावर पदवीपूर्व स्तरावरील प्रथम वर्ष प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई), कौन्सिल ऑफ इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनकडून (आयसीएसई) बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर होणे बाकी आहे. त्यामुळे संबंधित मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रियेत दहा टक्के जागा राखीव ठेवण्याचा, गरजेनुसार महाविद्यालयांना दहा टक्क्यांपर्यंत जागा वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे.

दरवर्षी सीबीएसई, आयसीएसईच्या निकालानंतर राज्य मंडळाचे निकाल जाहीर होतात. मात्र  यंदा सीबीएसई, आयसीएसईने मूल्यमापन पद्धतीमध्ये बदल केल्याने या मंडळांचे निकाल जाहीर झालेले नाहीत. तसेच निकाल कधीपर्यंत जाहीर होणार या बाबत काहीच संकेतही देण्यात आलेले नाहीत. मात्र विद्यापीठ-महाविद्यालयांतील पदवीपूर्व स्तरावरील अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याने सीबीएसई, आयसीएसईतून बारावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रथम वर्ष प्रवेशाचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. यंदा पहिल्यांदाच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे म्हणाले, की गेल्या काही वर्षांतील प्रवेश प्रक्रियेचा आढावा घेतला असता त्यात सीबीएसई, आयसीएसई आदी मंडळांच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण दहा टक्क्यांच्या घरात आहे. तसेच काही विद्यार्थी स्वायत्त महाविद्यालयांमध्येही प्रवेश घेतात. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांतील दहा टक्के जागा या विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवल्या जातील. तसेच या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या गरजेनुसार दहा टक्क्यांपर्यंत अतिरिक्त जागा महाविद्यालयांच्या मागणीनुसार देण्यास मान्यता दिली जाईल. सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश प्रक्रियेत संधी मिळण्याची गरज असल्याने हा निर्णय घेण्यात आला.

स्वायत्त महाविद्यालयांचे वेगवेगळे पर्याय

सीबीएसई, आयसीएसईचा निकाल आल्यावर एकत्र गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल. त्यामुळे महाविद्यालयाचे शैक्षणिक कामकाज थोडे उशिरा सुरू होईल, असे सिम्बायोसिस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हृषीकेश सोमण यांनी सांगितले. राज्य मंडळाच्या बारावीच्या निकालानंतर प्रथम वर्ष पदवीची प्रवेश प्रक्रिया सुरू केली असली, तरी प्रवेश प्रक्रिया सुरूच राहील. सध्या केवळ प्रवेश अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे सीबीएसई, आयसीएसईकडून बारावीचा निकाल जाहीर झाल्यावर त्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळेल, असे स. प. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सविता दातार यांनी नमूद केले.