पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लवकरच ‘पदवी प्रशाला’ (स्कूल ऑफ अंडर ग्रॅज्युएट स्टडीज) सुरू करण्याचा मानस आहे. त्या अंतर्गत अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रम सुरू करण्याची कल्पना असून, अवकाश आणि संरक्षण तंत्रज्ञान विषयातील अभ्यासक्रम सुरू करण्याचे नियोजन असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी दिली. तसेच, नाशिक उपकेंद्रात एअरोनॉटिकल इंजिनिअरिंग आणि वाईन टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम राबवण्याची कल्पना असल्याचेही त्यांनी नमूद केले.
विद्यापीठाची अर्थसंकल्पीय अधिसभा शुक्रवारी सुरू झाली. त्यात कुलगुरूंनी अहवाल सादर सादर करताना भविष्यातील योजनांबाबतही मांडणी केली. प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर, प्रभारी कुलसचिव चारुशीला गायके या वेळी उपस्थित होते. विद्यापीठाच्या विविध विभागांमध्ये उच्च दर्जाचे संशोधन, एकस्व अधिकार (पेटंट) मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्य सरकारच्या आदेशानुसार विद्यापीठांमधील विभागांअंतर्गत ‘फ्रेमवर्क रॅँकिंग’ करण्यात येणार आहेत. विविध विभागांना बळ देण्यासाठी ‘विभाग शाश्वत संशोधन अनुदान’ योजना विद्यापीठामार्फत नव्याने सुरू करण्यात येत आहे. या अंतर्गत विभागांना त्यांच्या क्रमवारीनुसार दोन ते दहा लाख रुपयांपर्यंतचे अनुदान देण्यात येईल. त्यात सर्व विभागांमधील संशोधनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे डॉ. गोसावी यांनी स्पष्ट केले.
‘अध्यापक आदानप्रदान’ उपक्रमात आशियाई देशातील काही प्राध्यापक आपल्याकडे येतील आणि आपल्या विभागांमधील काही प्राध्यापक आशियायी देशातील विद्यापीठांमध्ये जातील. अशा प्रकारे शिक्षकांचे साधारणतः दोन ते आठ आठवडे अशा काळासाठी आदानप्रदान होईल. त्यातील प्राध्यापक ‘सुप्रतिष्ठित प्राध्यापक’ (डिस्टिंग्विश प्रोफेसर) असतील. जागतिक आणि राष्ट्रीय क्रमवारीमध्ये विद्यापीठात आंतरराष्ट्रीय स्तरावरील किती प्राध्यापक आहेत, याचा विचार केला जातो. त्या दृष्टीने ‘आंतरराष्ट्रीय अतिथी विद्याशाखा योजना’ राबविण्याचा मानस आहे. त्यात जागतिक स्तरावरील आघाडीच्या विद्यापीठांमधील संशोधनात सर्वोच्च असणाऱ्या प्राध्यापकांचा समावेश असणार आहे. सुप्रतिष्ठित प्राध्यापक अभ्यासक्रम विकसित करतील आणि विद्यापीठातील संशोधनाला जागतिक स्तरावर घेऊन जाण्यासाठी सहकार्य करतील, असे सूतोवाच डॉ. गोसावी यांनी केले.
‘प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिक्स’च्या नामवंत उद्योग समूहातील मुख्य कार्यकारी अधिकारी, संचालक यांना ‘मानद प्रतिष्ठित प्राध्यापक’ (ऑनररी डिस्टिंग्विश प्रोफेसर) म्हणून आमंत्रित करण्यात येईल. त्यात संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ), भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्त्रो) शास्त्रज्ञांचा अनुभव, ज्ञानाचा लाभ विद्यापीठातील शिक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी करण्यात येईल, असेही कुलगुरूंनी सांगितले.
भरती प्रक्रियेसाठी वेळापत्रक निश्चित
विद्यापीठातील प्रलंबित प्राध्यापक भरतीसह अधिष्ठाता, परीक्षा संचालक पदांच्या भरती प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार अधिष्ठाता, परीक्षा संचालक पदांसाठीच्या मुलाखती एप्रिलमध्ये घेतल्या जाणार आहेत. तर, प्राध्यापक भरतीसाठीच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण करून नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला १११ प्राध्यापक विद्यापीठाला मिळतील, असेही कुलगुरूंनी स्पष्ट केले.
