पुणे : नवउद्यमी सुरू करण्यासाठी अन्नप्रक्रिया, आरोग्य, डीपटेक, शिक्षण अशा क्षेत्रांचा प्राधान्याने विचार करीत असल्याचा कल दिसून येत आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ‘सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्राइझ’तर्फे आयोजित बूटकॅम्पमध्ये एकूण ४३२ कल्पना सादर करण्यात आल्या. त्यात सर्वाधिक ८७ कल्पना अन्नप्रक्रिया उद्योगांशी संबंधित होत्या.

विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना बळ देण्यासाठी, उद्योजकतेला चालना देण्यासाठी नवकल्पनांचा विकास करण्यासाठी ‘सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्राइझ’तर्फे महाविद्यालयांमध्ये २० नवउद्यमी बूटकॅम्प आयोजित करण्यात आले. पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यांतील महाविद्यालयांमध्ये २७ जानेवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत हा उपक्रम राबवण्यात आला. सुमारे ४ हजार विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला.

विद्यापीठात सक्षम स्टार्ट-अप परिसंस्था निर्माण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून गेल्या वर्षीपासून स्टार्ट-अप बूटकॅम्प आणि स्टार्ट-अप ऑलिम्पियाडसारख्या उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना पारंपरिक करिअरच्या पलीकडे जाऊन उद्योजकतेचा विचार करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. यंदाही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा या ‘बूूटकॅम्प’ उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला.

‘विद्यार्थ्यांनी कृषी, आरोग्य, शिक्षण, पुरवठा साखळी, अन्न, पर्यावरण अशा विविध क्षेत्रांतील उद्योग कल्पना मांडल्या. विविध शाखांतील विद्यार्थ्यांना नवकल्पना विकसित करण्यासाठी मार्गदर्शन, नेटवर्क आणि इन्क्युबेशन सुविधा उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे,’ असे ‘सेंटर फॉर इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड एंटरप्राइझ’चे संचालक डॉ. देविदास गोल्हार यांनी सांगितले.

विद्यापीठात आजपासून ‘स्टार्ट-अप ऑलिम्पियाड’

‘महाविद्यालयांतील ‘बूटकॅम्प’मध्ये सादर झालेल्या कल्पनांतील निवडक १०० कल्पना पुढील टप्प्यासाठी निवडण्यात आल्या. त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रारूप, गुंतवणुकीच्या टप्प्यावर पोहोचलेल्या ५१ कल्पनांचे सादरीकरण ‘एसपीपीयू स्टार्ट-अप ऑलिम्पियाड २०२६’मध्ये होणार आहे. हा कार्यक्रम १७ आणि १८ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे. यात निवड झालेल्या संघांना तज्ज्ञ परीक्षक, मार्गदर्शक आणि गुंतवणूकदारांसमोर त्यांची नवउद्यमीची संकल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. त्यातील निवडक संकल्पना ‘एसपीपीयू इन्क्युबेशन सेंटर’मध्ये पुढील मार्गदर्शनासाठी निवडण्यात येणार आहेत,’ असेही डॉ. गोल्हार यांनी सांगितले.

बूटकॅम्पमध्ये सादर झालेल्या नवउद्यमी कल्पनांची क्षेत्रनिहाय आकडेवारी

अन्नप्रक्रिया – ८७
डीपटेक – ७६
आरोग्य – ७६
शिक्षण – ३९
सॉफ्टवेअर – ३३
पर्यावरण – २२
आर्थिक – १७
शेल्टर – १७
उद्योग सेवा – ११
कपडे – ११
लॉजिस्टिक्स – ९
मनोरंजन – ९
मोबिलिटी – ८
आतिथ्य – ६
उत्पादन – ६
ऊर्जा – ५