पुणे : पुणे शहर आणि परिसराला पावसाने झोडपले आहे. दुपारपासून मध्यवर्ती शहरासह उपनगरांसह पिंपरी चिंचवडमध्ये ढगांचा कडकडाट, विजांच्या कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची नोंद झाली.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हवेच्या वरच्या स्तरात पाच ते दहा किमी अतंरावरून पश्चिमेकडून दक्षिणेकडे थंड हवेचा झोत वेगाने वाहत आहे. हा थंड हवेचा झोत सरळ न वाहता वर-खाली नागमोडी पद्धतीने वाहत आहे. त्यामुळे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे थंड हवेत मिसळून पाऊस आणि गारपिटीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. ३० मार्च रोजी शहरात बाणेरसह काही ठिकाणी गारपीट झाली होती, तर काही ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. शिवाजीनगर येथे नोंदवला गेलेला २६.६ मिलिमीटर पाऊस दशकभरातील सर्वाधीक ठरला. तसेच बुधवारीही शहरात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला.
या पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी दोन वाजल्यानंतर वातावरणात बदल होण्यास सुरुवात झाली. आकाश ढगांनी व्यापले, अंधारून आले. ढगांच्या गडगडाटासह शहराच्या मध्यवर्ती भागात जोरदार पाऊस सुरू झाला. तसेच सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाटही होत होता. शहरातील मध्यवर्ती पेठ, कात्रज, औंध, बाणेर, बिबवेवाडी, कोथरूड, शिवाजीनगर, उंड्री अशा बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली.
जोरदार पावसामुळे रस्त्यांवर ओढ्यासारखे पाणी वाहू लागले. सखल भागांमध्ये पाणी साचले. वाहनचालकांनाही त्रास सहन करावा लागला.
