पुणे : अवकाळी पावसामुळे शहरातील वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. मात्र, पावसामुळे शहरातील वाहतुकीचा वेग संथ झाला. सोमवारी सायंकाळी शहराच्या वेगवेगळ्या भागातील वाहतूक विस्कळीत झाली.
शहर परिसरात सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्यास सुुरुवात झाली. पावसामुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या. सदाशिव पेठ, खडक पोलीस वसाहत, प्रभात रस्ता, बाणेर गावठाण, गोखलेनगर, सोमवार पेठ ताडीवाला रस्ता परिसरात झाडे कोसळली. झाडे कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. फांद्या पडल्यानंतर वाहतूक विस्कळीत झाली. जवानांनी फांद्या हटवून वाहतूक सुरळीत केल्याची माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाने दिली.
पावसामुळे वाहतूक विस्कळीत झाली. सोमवारी सायंकाळी शासकीय, तसेच खासगी कार्यालये सुटल्यानंतर लष्कर, महापालिका भवन, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, पं. जवाहरलाल नेहरू रस्ता, पुणे स्टेशन परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली. शहरातील प्रमुख रस्त्यावरील वाहतुकीचा वेग संथ झाला होता. वाहतूक नियोजनासाठी प्रमुख चौक, तसेच रस्त्यांवर वाहतूक पोलिसांकडून अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पावसामुळे पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग संथ झाला, अशी माहिती वाहतूक पोलिसांकडून देण्यात आली.
