scorecardresearch

पुणे : लग्नासाठी महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी

मारहाण करणारा तरुण बीड जिल्ह्यातील… संशय घेत असल्याने महिलेनं लग्नास दिला होता नकार…

पुणे : लग्नासाठी महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
मारहाण करणारा तरुण बीड जिल्ह्यातील… संशय घेत असल्याने महिलेनं लग्नास दिला होता नकार…

महिलावरील हिंसेच्या घटनांवर सातत्यानं चिंता व्यक्त केली जात असतानाच पुण्यात चक्क महिला पोलीस अधिकाऱ्यालाच मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पुणे शहर पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदी कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस अधिकाऱ्याला मित्रानेच मारहाण केली आहे. ‘माझ्यासोबत लग्न कर नाही; लग्न न केल्यास तुझे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल’, अशी धमकी देत मारहाण महिलेला मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सिद्धांत भगवानराव जावळे (वय ३०, रा. माजलगाव, जि. बीड) असं आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सिद्धांत भगवानराव जावळे आणि पीडित महिला अधिकारी हे दोघे मित्र होते. त्या दोघांचे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. नंतर काही दिवसांनी आरोपीने महिलेवर सतत संशय घेऊन शिवीगाळ आणि मारहाण करायला सुरूवात केली. या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने लग्न करण्यास नकार दिला.

हेही वाचा- पिंपरीत महिलेचा व्हिडिओ घेऊन तृतीय पंथीच्या गाण्यावर केला डब; गुन्हा दाखल

महिलेनं लग्न करण्यास नकार दिल्यानंतर आरोपीने पीडितेच्या नातेवाईकांनाही फोन करून धमकी दिली होती. ‘माझं तिच्याशी लग्न लावून द्या; अन्यथा मी आत्महत्या करेन. अॅट्रॉसिटीचा तक्रार दाखल करेन. फेसबुक, युट्यूब आणि व्हॉट्सअपवर फोटो, व्हिडिओ व्हायरल करेन’, अशी धमकी दिली होती. आरोपी इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडित महिलेकडे पैशांची मागणीही केली होती.

हेही वाचा- लष्करात नोकरी लावतो सांगून ४० पेक्षा अधिक तरूणांना ५० लाखाला गंडवले

‘तुझी नोकरी सोडून दे किंवा मला तुझा पाच वर्षाचा पगार दे’, अशी मागणी त्याने महिला अधिकाऱ्याकडे केली होती. साधारण मागील वर्षभरापासून आरोपी महिलेला त्रास देत होता. त्याच कालावधीत आरोपीनं पीडित महिलेकडून अनेकवेळा पैसे देखील घेतले आहे. या सर्व त्रासाला कंटाळून अखेर पीडित महिला अधिकाऱ्यानं पोलिसांकडे तक्रार दिली दाखल केली आहे. सिद्धांत भगवानराव जावळे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे लोणीकंद पोलिसानी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-07-2021 at 12:15 IST

संबंधित बातम्या