पुणे : महानगरांमधील अनधिकृत, अनियंत्रित बांधकामे, अपुरी गृहनिर्माण व्यवस्था चिंताजनक आहे. हरित क्षेत्रात घट होत असल्याने वाढती उष्णता, पावसात होत असलेले बदल, अचानक येणारे पूर अशा आव्हानांमुळे शहरांची असुरक्षितता वाढत आहे. त्यामुळे महानगरांच्या नियोजनामध्ये हवामान बदलाच्या परिणामांना तोंड देण्याची क्षमता विकसित करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत माजी सनदी अधिकारी, शहरी प्रशासन तज्ज्ञ डॉ. रामनाथ झा यांनी मांडले. शहरांमधील जीवनमानाचा दर्जा घसरत राहिल्यास त्याचे व्यापक आर्थिक परिणाम होऊ शकतात. तसेच उत्तम पायाभूत सुविधा, सार्वजनिक सेवा आणि जीवनमानाच्या शोधात तरुण, भांडवलाचा देशाबाहेर ओघ वाढू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेच्या काळे सभागृहात डॉ. पी. आर. दुभाषी व्याख्यानावेळी डॉ. झा बोलत होते. ‘महानगरांपुढील संकट : सुधारणांची अपरिहार्यता’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. डॉ. गोखले संस्थेचे कुलगुरू प्रा. उमाकांत दाश, डॉ. मेधा दुभाषी या वेळी उपस्थित होते. डॉ. झा यांनी देशात झपाट्याने विस्तारत असलेल्या महानगरांसमोरील आव्हानांची मांडणी केली.
डॉ. झा म्हणाले, देशातील ८० प्रमुख शहरांमध्ये ५५ कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या वास्तव्यास असून ही शहरे देशाच्या आर्थिक विकासाची प्रमुख केंद्रे बनली आहेत. मात्र, नागरीकरणाचा वेग आणि त्याचे प्रमाण लक्षात घेता अनेक शहरांमधील पायाभूत सुविधा, नागरी सेवा त्याच वेगाने विकसित झालेल्या नाहीत. शहरी भागातील घसरत चाललेली हवेची गुणवत्ता, त्याचा सार्वजनिक आरोग्यावर होणारा परिणाम, अपुरी सांडपाणी प्रक्रिया, खराब रस्ते, पादचारी सुविधा, वाहतूक कोंडी, अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अशी अनेक आव्हाने आहेत. देशातील केवळ १७ शहरांमध्ये मेट्रो रेल्वे सेवा कार्यरत असून, सक्षम शहरी वाहतूक व्यवस्थेची गरज आहे.
देशातील महानगरीय संकट केवळ टप्प्याटप्प्याने राबवल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमधून दूर होणार नाही. तर सक्षम संस्थात्मक व्यवस्था, विद्यमान धोरणांची प्रभावी अंमलबजावणी आणि व्यापक प्रशासकीय सुधारणा यांची गरज आहे. त्यासाठी सध्याची शहरी धोरणे आणि महानगरपालिका मार्गदर्शक तत्त्वांची काटेकोर, कालबद्ध अंमलबजावणी, वस्तू आणि सेवा करातून (जीएसटी) उपलब्ध होणाऱ्या निधीसह शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना उपलब्ध आर्थिक संसाधनांचा अधिक प्रभावी वापर; कालबाह्य महानगरपालिका कायद्यांचे आधुनिकीकरण, ग्रीनफिल्ड शहरांच्या विकासाला आणि शहरी विकासाच्या नव्या पद्धतींना अधिक प्राधान्य, सक्षम पायाभूत सुविधा व उच्च दर्जाच्या नागरी सेवा विकसित करण्यासाठी खासगी शहरांसारख्या नाविन्यपूर्ण संकल्पनांचा शोध, विचार गरजेचा आहे, असे डॉ. झा यांनी सांगितले.
संकेतस्थळाचे लोकार्पण
कार्यक्रमात डॉ. पी. आर. दुभाषी यांच्या कन्या डॉ. मेधा दुभाषी यांच्या पुढाकारातून तयार करण्यात आलेल्या पी. आर. दुभाषी संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. https://www.padmabhushan-prdubhashi.in/LibStats.html या दुव्याद्वारे संकेतस्थळ पाहता येणार आहे.
