पुणे : नेहमीप्रमाणे तेलाच्या घाण्यावर बसून काम करीत असताना एका व्यक्तीचा हात अचानक आतमध्ये गेला. काही कळण्याआधीच हात गेल्याने त्या व्यक्तीला काहीच समजले नाही. त्याने हात बाहेर काढला त्यावेळी पंजाचा बराच भाग तुटला होता. हाताच्या रक्तवाहिन्या, स्नायुबंध, ऊती आणि चेतातंतू तुटले होते. डॉक्टरांनी गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे या व्यक्तीचा हात पूर्ववत करण्यात यश मिळविले आहे.

उरळी कांचन परिसरात ही घटना घडली. या परिसरात संबंधित ४६ वर्षीय व्यक्तीचा तेलाचा घाणा आहे. तिथे ते तेलबियांपासून तेल काढण्याचे काम करतात. ते १८ फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे हे काम करीत असताना अचानक त्यांचा हात घाण्याच्या आतमध्ये गेला. काहीच कळण्याआधी घडलेल्या घटनेमुळे त्यांना धक्का बसला. त्यांनी हात बाहेर ओढला त्यावेळी पंजाचा बराच भाग तुटलेल्या अवस्थेत होता. त्यांना तातडीने पुण्यातील इनामदार मल्टिस्पेशालिटी हॉस्टिपलमध्ये हलविण्यात आले. डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत या व्यक्तीच्या हाताचा काही भाग, बोटे तुटल्याचे आढळले. याचबरोबर हातातील रक्तवाहिन्या, स्नायुबंध, चेतातंतू आणि ऊती फाटल्या होत्या. पंजाच्या पुढील भागाला होणारा रक्तप्रवाह थांबल्यामुळे बोटे कायमस्वरूपी निकामी होण्याची शक्यता होती. यामुळे त्यांना हाताचे कायम पंगुत्व येण्यासोबत हाताचा पुढचा भाग पूर्णपणे काढून टाकावा लागण्याचाही धोका होता.

अशी झाली शस्त्रक्रिया…

रुग्णालयातील डॉ. अभिषेक घोष यांनी तातडीने हाताच्या जोडणीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. यात हाताच्या तुटलेल्या रक्तवाहिन्या जोडून ऊतींचे संरक्षण करण्यावर भर देण्यात आला. काही तास चाललेल्या या शस्त्रक्रियेत हाताचा तुटलेला भाग जोडण्यासोबत रक्तवाहिन्या, चेतातंतू, स्नायुबंध आणि ऊती पुन्हा जोडण्यात आल्या. सध्या या रुग्णाची प्रकृती स्थिर असून, त्यात सुधारणा होत आहे. आता त्याच्या हाताची फिजिओथेरपी सुरू करण्यात येणार असून, त्यात हाताच्या हालचाली पूर्ववत करण्यावर भर देण्यात येणार आहे. पुढील काही महिन्यांत तो हाताने पूर्ववत काम करू शकेल, अशी माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली.

Award Banner

रक्तप्रवाह पूर्ववत करणे महत्त्वाचे

या शस्त्रक्रियेत हातातील रक्तप्रवाह पूर्ववत करण्यासोबत त्यातील संवेदना कायम राहाव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात आले. अशा प्रकारच्या घटनांमध्ये रक्तप्रवाह तातडीने पूर्ववत करणे महत्त्वाचे असते. त्याचवेळी चेतातंतूची काळजीपूर्वक दुरुस्ती आणि स्नायुबंधांचे संरक्षणही महत्त्वाचे ठरते. यामुळे रुग्णाचा तुटलेला अवयव आणि त्याची हालाचाल पूर्ववत करण्यास मदत होते, असे मायक्रोव्हॅस्क्युलर सर्जन डॉ. अभिषेक घोष यांनी सांगितले.