पुणे : लॅब्रेडोर जातीच्या पाळीव श्वानाने १२ वर्षीय मुलाच्या चेहऱ्याचा चावा घेतल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना वडगाव शेरी भागात घडली. जखमी मुलाच्या चेहऱ्याला आठ टाके पडले आहेत. याप्रकरणी श्वान मालकिणीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मुलाचे वडील विनोद (वय ४२) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास मुलगा घरातून बाहेर पडला. शेजारी राहणाऱ्या महिलेने लॅब्रोडर जातीचे श्वान पाळले आहे. श्वानाने त्याच्या चेहऱ्याचा चावा घेतला. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या चेहऱ्याला आठ टाके पडले आहेत. रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले.

पाळीव श्वानाला सुरक्षितरीत्या बांधून न ठेवणे, तसेच आवश्यक ती काळजी न घेतल्याने ही घटना घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. श्वानाच्या देखभालीत निष्काळजीपणा दाखविल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस फौजदार लिंगण्णा तपास करत आहेत.