पुणे : कॉस्मेटिक ज्वेलरी दुकानाच्या आडून ई-सिगारेट, प्रतिबंधित हुक्का फ्लेवर आणि गांजाची विक्री करणाऱ्या तरुणीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. विमाननगरमधील एका दुकानावर छापा टाकून पोलिसांनी ई-सिगारेट, हुक्का फ्लेवर, १३० ग्रॅम गांजा, अन्य साहित्य असा एकूण मिळून दोन लाख १७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी अभिलाषा पंकज अहिरराव (वय २२, रा. विमाननगर) हिला अटक करण्यात आली. विमाननगर भागात काॅस्मेटिक ज्वेलरी दुुकानातून ई-सिगारेट, हुक्का फ्लेवरची विक्री होत असल्याची माहिती गस्त घालणारे पोलीस कर्मचारी हरीप्रसाद पुंडे आणि लालू कऱ्हे यांना मिळाली. त्यानंतर बुधवारी (३ नोव्हेंबर) विमाननगर येथील दुकानावर छापा टाकण्यात आला. या कारवाईत दुकानात, दुकानाबाहेर लावलेल्या दुचाकीच्या डिक्कीत ई-सिगारेट, प्रतिबंधित हुक्का फ्लेवर आणि १३० ग्रॅम गांजा आढळून आला.

अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, परिमंडळ सातचे पोलीस उपायुक्त अबिनाशकुमार, सहायक आयुक्त सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, गुन्हे शाखेचे निरीक्षक महेश बोलके, प्रल्हाद गिते, उपनिरीक्षक नितीन राठोड, हर्षल घागरे, हरीप्रसाद पुंडे, लालू कुऱ्हे, रूपेश पिसाळ, अभय नागटिळक, राहुल जोशी, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, प्रशांत सुतार, सागर कासार, प्रणिता थोरात, अंकुश जोगदंडे यांनी ही कारवाई केली.

मोबाईलचा वापर करून विक्री

पोलिसांनी या प्रकरणात अटक केलेल्या तरुणीची चाौकशी केली. तेव्हा ती मोबाइलचा वापर करून बंदी घातलेले हुक्का फ्लेवर, ई-सिगारेट, तसेच गांजाची विक्री करत होती. विमाननगर भागातील माहिती-तंत्रज्ञान कंपन्यातील कर्मचारी, शिक्षण संस्थांतील तरुणांशी ती मोबाइलच्या माध्यमातून संपर्क साधत होती. तिने डेक्कन जिमखाना भागात दुकान सुरू केले होते. हे दुकान बंद केल्यानंतर तिने विमाननगर भागात काॅस्मेटिक्स ज्वेलरीचे दुकान सुरू केले. दुकानाच्या आडून ते बेकायदा व्यवसाय करत होती. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंध कायदा, तसेच इलेक्ट्रिक सिगारेट प्रतिबंध कायदा, सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण अधिनियम या कलमांन्वये कारवाई करण्यात आली.