दरवर्षीच्या दिमाखात, पारंपरिक पद्धतीने आणि कार्यकर्त्यांच्या अलोट उत्साहात निघालेल्या पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीची सांगता शुक्रवारी दुपारी तीन वाजता झाली. ही विसर्जन मिरवणूक २८ तास ३० मिनिटे चालली, तर मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला नऊ तास २० मिनिटे लागली. पावसामुळे या वर्षी मिरवणुकीत गर्दीचे प्रमाण कमी होते.

पुण्याच्या वैभवशाली मिरवणुकीला गुरुवारी सकाळी साडेदहा वाजता प्रारंभ झाला. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीच्या ‘श्रीं’ची आरती महापौर प्रशांत जगताप आणि पालक मंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीमध्ये झाल्यानंतर मिरवणूक मार्गस्थ झाली.

नगारखाना, घोडे, पारंपरिक वाद्यपथके, बँड पथके यामुळे या वर्षीही मानाच्या गणपतींची मिरवणूक लक्षवेधी ठरली. सकाळपासूनच शहरभर सुरू झालेल्या पावसाने गर्दीला मात्र ओहोटी लावली.

दरवर्षी मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीसाठी सकाळपासूनच लक्ष्मी रस्ता गर्दीने फुलून जातो. या वर्षी मात्र पावसामुळे सकाळी गर्दीचे प्रमाण कमी होते. सायंकाळनंतर मात्र अधून मधून येणारी एखादी सर मिरवणुकीचाच भाग बनून गेली आणि एलईडी दिव्यांचा झगमगाट आणि डीजेच्या तालावर लक्ष्मी रस्त्याबरोबरच, कुमठेकर, केळकर आणि टिळक रस्ता थिरकू लागला. सायंकाळनंतर मिरवणुकीतील गर्दी हळूहळू वाढू लागली.

मिरवणूक मार्गाच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर थाटलेल्या खेळणी आणि खाण्याच्या गाडय़ांनी शहराला जत्रेचे रूप आले होते. मुख्य रस्त्यांबरोबरच उपनगरांमध्येही मिरवणुकीचा उत्साह दिसत होता. लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता आणि टिळक रस्ता या चार मुख्य मिरवणूक मार्गापैकी केळकर रस्त्यावरील मिरवणुकीतील शेवटचे मंडळ टिळक चौकात शुक्रवारी दुपारी दोन वाजता आले. या चार मार्गावरून ६२५ मंडळांची मिरवणूक गेली. त्यात लक्ष्मी रस्त्यावरून २४१, टिळक रस्त्यावरून १९६, कुमठेकर रस्त्यावरून ५८ आणि केळकर रस्त्यावरून १३० मंडळे आली होती. दुपारी तीन वाजता मिरवणुकीतील शेवटच्या गणेश मूर्तीचे विसर्जन झाले. गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे आमंत्रण देत या मिरवणुकीची आणि यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता झाली.

मिरवणूक लवकर संपल्याचा दावा

या वर्षी मिरवणूक २५ मिनिटे लवकर संपल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात येत आहे. प्रत्यक्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी मिरवणुकीची वेळ पाच मिनिटांनी वाढल्याचेच आधीच्या नोंदींवरून दिसत आहे.