पुणे : मतदारयादीच्या विशेष सखोल पुनर्रीक्षण कार्यक्रमांतर्गत (एसआयआर) जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघांची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून, जिल्ह्यात ६२ लाख १३ हजार ६९२ मतदारांची नोंदणी झाली आहे. तब्बल २८ लाख ६६ हजार ४८१ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. प्रारूप मतदारयादीतील मतदारांपैकी विसंगती आणि ‘मॅपिंग’ न झालेल्या १३ लाख ३२ हजार ४१८ मतदारांच्या सुनावण्या घेतल्या जाणार आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक मतदार हे भोसरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक चार लाख ६१ हजार ९३४ मतदारांची नोंदणी झाली आहे. सर्वांत कमी मतदार शिवाजीनगर विधानसभा मतदार संघामध्ये एक लाख ६३ हजार २६१ झाले आहेत.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या उपस्थितीत ही यादी प्रसिद्ध करण्यात आली. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर, तहसीलदार शीतल मुळे आणि राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. ‘एसआयआर’ मोहीम सुरू होण्यापूर्वी जिल्ह्यात ९० लाख ८० हजार १७३ मतदार होते. मात्र, त्यापैकी २८ लाख ६६ हजार ४८१ मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामध्ये एक लाख ४३ हजार ९७५ दुबार, ३ लाख १२ हजार ४८ मयत, १७ लाख ८३ हजार ५८ अनुपस्थित, ५ लाख ९१ हजार ३८ स्थलांतरित आणि ३६ हजार ३६२ अन्य मतदार आहेत.
प्रारूप मतदारयादीतील ६२ लाख १३ हजार ६९२ मतदारांपैकी ३१ लाख ५१ हजार २९७ पुरुष, ३० लाख ६२ हजार १२ महिला आणि ३८३ तृतीयपंथी मतदार आहेत. प्रारूप मतदारयादीतील मतदारांपैकी ५ लाख ७७ हजार ८२१ मतदारांमध्ये विसंगती आणि ७ लाख ५४ हजार ५९७ मॅपिंग न झालेले असे १३ लाख ३२ हजार ४१८ मतदार आहेत. त्यांच्या सुनावण्या घेतल्या जाणार आहेत.
शिरूरमध्ये जास्त, तर दौंडमध्ये कमी
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर, दौंड, इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर आणि मावळ या दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये शिरूरमध्ये सर्वाधिक तीन लाख ७२ हजार मतदार झाले आहेत. सर्वांत कमी दौंडमध्ये दोन लाख ६९ हजार मतदारांची नोंद झाली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरी आघाडीवर
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील चिंचवड, पिंपरी आणि भोसरी या तीन मतदारसंघांमध्ये भोसरी मतदारसंघ हा जिह्यात आघाडीवर आहे. या मतदारसंघात चार लाख ६१ हजार मतदार झाले आहेत. पिंपरीत सर्वांत कमी दोन लाख ३६ हजार मतदारांची नोंदणी झाली आहे.
पुणे शहरात हडपसर प्रथम स्थानी
पुणे शहरातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये हडपसर मतदारसंघ प्रथम स्थानी आहे. या मतदारसंघात तीन लाख ५३ हजार मतदारांनी नोंदणी केली आहे. सर्वांत कमी मतदार हे शिवाजीनगरमध्ये एक लाख ६३ हजार नोंदविले गेले आहेत.
मतदान केंद्रांमध्ये वाढ
‘एसआयआर’मुळे सात मतदार केेंद्रे वाढली आहेत. आता जिल्ह्यात ८ हजार ४२४ मतदान केंद्रे झाली आहेत. त्यामध्ये जुन्नर ३५६, आंबेगाव ३४४, खेड-आळंदी ३९३, शिरूर ४५९, दौंड ३१५, इंदापूर ३३९, बारामती ३८८, पुरंदर ४१३, भोर ५६७, मावळ ४०२, चिंचवड ५६०, पिंपरी ३९७, भोसरी ४९१, वडगाव शेरी ४३८, शिवाजीनगर २६६, कोथरूड ३८७, खडकवासला ५०२, पर्वती ३४४, हडपसर ५२५, पुणे कॅन्टोन्मेंट २७०, कसबा पेठ २६८ मतदान केंद्रांचा समावेश असणार आहे.
सुनावणी कोठे?
प्रारूप मतदारयादीमध्ये समाविष्ट मतदारांच्या तपशिलात तफावत आढळल्यास; तसेच २००२ च्या मतदारयादीशी मॅपिंग झालेले नसलेल्या मतदारांसाठी संबंधित यादी भागाच्या सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांच्या स्तरावर सुनावणी घेण्यात येणार आहे. सुनावणीनंतर संबंधित मतदाराचे नाव अंतिम मतदारयादीत समाविष्ट करायचे किंवा नाही, याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
हरकतींसाठी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत
प्रारूप मतदारयादीवर दावे आणि हरकती ३० सप्टेंबरपर्यंत करता येणार आहेत. या हरकतींवर २९ ऑक्टोबरपर्यंत कार्यवाही केली जाणार आहे. अंतिम मतदारयादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या यादीमध्ये नाव नसल्यास प्रपत्र क्रमांक ६ भरून नव्याने मतदार नोंदणी करता येणार आहे. तसेच यादी नावामध्ये आक्षेप असल्यास प्रपत्र क्रमांक ७ भरून आक्षेप नोंदविता येणार आहे. ईपीक कार्ड करिता प्रपत्र क्रमांक ८ भरता येणार आहे. मतदारयादीमध्ये दुरुस्ती देखील करून घेता येणार आहे.
मतदारयादी पाहण्याची सुविधा
प्रारूप मतदारयादी संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालय आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या जिल्हाध्यक्षांच्या कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या pune.gov.in संकेतस्थळावर ही यादी पाहता येणार आहे. याशिवाय, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ECINET आणि Voter Service Portal वरही उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.
