पुणे : ‘केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यात विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम राबविण्यात येणार असून, यामध्ये सुमारे ९१ लाख १६ हजार ३२५ मतदारांच्या नोंदींची घरोघरी जाऊन प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. मतदारयादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे,’ अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.

‘या मोहिमेंतर्गत ३० जून ते २९ जुलै या दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. घराघरात भेट देऊन पूर्वमुद्रित अर्जाद्वारे मतदारांची माहिती पडताळणार आहेत. नाव, पत्ता, छायाचित्र किंवा अन्य तपशीलांमध्ये बदल असल्यास त्याची नोंद करता येणार आहे. तसेच अब्सेंट, शिफ्टेड, डेड आणि डुप्लिकेट (एएसडीडी) प्रकारातील नोंदींची तपासणीही केली जाणार आहे. सन २००२ ते २००४ मधील जुन्या मतदारयाद्यांशी मॅपिंग उपलब्ध असल्यास अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता भासणार नाही,’ असे डुडी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, ‘या मोहिमेचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले असून, २० ते २९ जूनदरम्यान गणना अर्जांची छपाई आणि बीएलओ यांना प्रशिक्षण दिले जाईल. ३० जून ते २९ जुलै या दरम्यान मतदारांच्या घरी बीएलओ प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. ५ ऑगस्टरोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. तर, ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान दावे आणि हरकती नोंदवता येणार आहेत. ३ ऑक्टोबरपर्यंत दावे आणि हरकती निकालात काढण्यात येतील आणि ७ ऑक्टोबरला अंतिम मतदारयादी प्रसिद्ध केली जाईल,’ असे डुडी यांनी स्पष्ट केले.

‘जिल्ह्यातील सुमारे ८ हजार ४१७ बीएलओ आणि विविध राजकीय पक्षांचे ४ हजार ५५७ मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधी (बीएलए) या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत. निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया पूर्णपणे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने राबविली जाईल तसेच कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाणार नाही,’ असेही त्यांनी सांगितले.