पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदार याद्यांची विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम (एसआयआर) राबविण्यास सुरुवात करण्यात आली असून, या मोहिमेत राजकीय पक्षांचा सहभाग वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दर बुधवारी राजकीय पक्षांची बैठक घेण्यात येणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय पक्षांच्या प्रमुखांसोबत बैठक घेऊन त्यांना मतदान केंद्र प्रतिनिधींची (बीएलए) नेमणूक करण्याच्या सूचना द्याव्यात, असे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
‘एसआयआर’निमित्ताने मतदार नोंदणी अधिकारी आणि सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आले. त्यावेळी जिल्हाधिकारी डुडी बोलत होते. यावेळी अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त तुषार ठोंबरे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, “एसआयआर’च्या कार्यवाहीबाबत माहिती देण्यासाठी दर बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांबरोबर बैठक घेण्यात येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदारसंघनिहाय राजकीय पक्षांच्या प्रमुखांबरोबर बैठकीचे आयोजन करावे. त्यांना मतदान केंद्र प्रतिनिधींची (बीएलए) नेमणूक करण्यास सांगावे. तसेच त्यांना ‘अन मॅप’ झालेल्या मतदारांची यादी उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.’
‘राज्यात सर्वाधिक मतदार संख्या ही पुणे जिल्ह्यात आहे. एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये आणि अपात्र मतदार हे यादीत समाविष्ट होऊ नयेत, यासाठी ‘एसआयआर’ मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी गणना पत्रकाची छपाई आणि त्याचे वितरण नियोजनपद्धतीने करावे. ‘एसआयआर’ प्रक्रियेबाबत प्रशिक्षण सत्र आयोजित करुन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) प्रशिक्षण देण्यात यावे. मतदारांकडून गणना पत्रकात विचारलेली माहिती वेळेत भरली जाईल, याबाबत दक्षता घ्यावी. आवश्यक तिथे ‘बीएलओं’नी मतदारांना मार्गदर्शन करावे,’ असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी सांगितले.
‘शहरी भागात गृह निर्माण संस्था आणि औद्योगिक संस्थाबरोबर बैठक घेऊन प्रक्रिया पूर्ण करावी. तृतीयपंथीय, दिव्यांग, देह विक्री करणाऱ्या महिला, ८५ पेक्षा अधिक वयोवृद्ध मतदार यांच्यासाठी कार्यरत सामाजिक संघटनांची मदत घ्यावी, असेही डुडी म्हणाले.
‘एसआयआर’चे नियोजन
– २९ जूनपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना (बीएलओ) प्रशिक्षण आणि गणना अर्ज छपाई
– ३० जून ते २९ जुलै या कालावधीत ‘बीएलओं’मार्फत घरोघरी भेटी देऊन अर्ज वितरण
– ५ ऑगस्ट रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध
– दावे आणि हरकतीसाठी ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत मुदत
– दावे आणि हरकतींवर ५ ऑगस्ट ते ३ ऑक्टोबर दरम्यान सुनावणी – ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
