पुणे : संगणक अभियंता तरुण-तरुणीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन त्यांच्याकडून वाघोली पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी पैसे उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी तिघांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
पोलीस हवालदार किरण अब्दागिरे, पोलीस शिपाई गणेश खाडे, किरण कांबळे अशी निलंबित करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अब्दागिरे, खाडे, कांबळे हे वाघोली पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. २ एप्रिल रोजी खाडे आणि कांबळे हे रात्रपाळीत गस्त घालत होते. त्या वेळी वाघोलीतील एका सदनिकेत तरुणींना बोलावून त्यांची चित्रफीत तयार करण्यात येत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाने त्यांना दिली. नियंत्रण कक्षाला कळविण्यात आलेल्या माहितीची शहानिशा करण्यासाठी खाडे अणि कांबळे हे सोसायटीत पोहोचले. त्यानंतर सदनिकेत ते गेले. तेव्हा सदनिकेत असलेल्या संगणक अभियंता तरुण-तरुणीला धमकाविण्यास सुरुवात केली. त्या वेळी रात्रपाळीत पोलीस ठाण्यात अब्दागिरे होते. तरुणाला त्यांनी मारहाण केली. ‘तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल करुतो. तुमची नोकरी घालवितो’, अशी धमकी देऊन तरुणाला मारहाण केली.
तरुणाला घेऊन ते वाघोली पोलीस ठाण्यात गेले. तरुणीला ताटकळत ठेवले. हे प्रकरण मिटवण्यासाठी दहा हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यानंतर तरुणाला धमकावून ऑनलाइन पद्धतीने एका मोबाइल क्रमांकावर दहा हजार रुपये पाठविण्यास सांगितले. हा क्रमांक एका गॅरेजचालकाचा होता. त्यानंतर संगणक अभियंता तरुण-तरुणीने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेतली. त्यांना या घटनेची माहिती दिली. परिमंडळ सातचे पोलीस उपायु्क्त सोमय मुंडे यांनी या प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर तिघांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले.
