पुणे : प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन आरोपी तरुणाच्या तीन मित्रांनी तरुणीवर बलात्कार केला. या प्रकरणी वाघोली पाेलिसांनी दोघांना अटक केली. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले असून, पसार झालेल्या एकाचा शोध घेण्यात येत आहे.
या बाबत २० वर्षीय पीडित तरुणीने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची आरोपीशी ओळख झाली. ओळखीतून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर तरुणाने तिला जाळ्यात ओढले. तिला विवाहाचे आमिष दाखविले. त्यानंतर त्याने तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर तरुण आणि त्याचे मित्र आणि अल्पवयीन मुलाने मित्राने समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित करण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याचा आरोप पीडित तरुणीने फिर्यादीत केला.
आरोपींकडून होणारा अत्याचार, धमकीमुळे घाबरलेल्या तरुणीने वाघोली पोलीस ठाण्यात नुकतीच फिर्याद दिली. या प्रकरणातील आरोपींचे मोबाइल संचाची तांत्रिक तपासणी करण्यात येणार आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात येत आहे.
