पुणे : वाघोलीतील एका बहुमजली इमारतीच्या आठव्या मजल्यावरुन उडी मारुन एका तरुणीने आत्महत्या केल्याची घटना घडली. तरुणीच्या आत्महत्यामागचे निश्चित कारण समजू शकले नाही .

सारा अंधारे (वय २०, रा. मॅजेस्टिक ओएसिस सोसायटी, वाघोली, नगर रस्ता) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधारे कुटुंब मूळचे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथील आहे. सारा ही आई आणि बहिणीसोबत राहत होती. ती अकरावीत होती. बहिस्थ पद्धतीने ती शिक्षण घेत होती. साराला ‘अभ्यासाकडे लक्ष दे, तसेच बाहेर पडताना सांगत जा’, असे सांगितले होते. साराने आठव्या मजल्यावरील मोकळ्या जागेतून (रेफ्युज एरिया) दुपारी साडेबाराच्या सुमारास उडी मारली.

गंभीर जखमी झालेल्या साराला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. वाघोली पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली.

आत्महत्येची तिसरी घटना

बाणेर भागात सासरच्या छळामुळे एका नवविवाहित तरुणीने इमारतीतून उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी उच्चशिक्षित पती, सासू, सासरा, नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यत आला होता. कर्वेनगर भागात एका विवाहित महिलेने पतीच्या छळामुळे विषारी ओैषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर वाघोलीतील बहुमजली इमारतीतून उडी मारून तरुणीने आतम्हत्या केल्याची घटना घडली.