पुणे : वानवडीतील परमार पार्क परिसरातील एका बंगल्यात पहाटे चोरट्यांनी दरोडा टाकला. ठेकेदार, तसेच त्याच्या कुटुंबीयांना धमकावून २७ लाख १५ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना उघडकीस आली.

या प्रकरणी तीन चोरांविरुद्ध वानवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या बाबत एका ६५ वर्षांच्या ठेकेदाराने फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ठेकेदाराचा वानवडीतील परमार पार्क परिसरात बंगला आहे. मंगळवारी (२१ जुलै) पहाटे तीनच्या सुमारास तीन चोरटे बंगल्यात शिरले. बंगल्याच्या पाठीमागील दरवाजाची लोखंडी जाळी कापून त्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर गाढ झोपेत असलेले ठेकेदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना शस्त्राचा धाक दाखविला. शयनगृहातील कपाटातून हिरेजडीत सोन्याचे दागिने, १३ लाख १५ हजारांची रोकड चोरट्यांनी चोरली. त्यानंतर ठेकेदाराची पत्नी आणि सासूच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेले. त्यानंतर चोरटे बंगल्यातून पसार झाले. या घटनेनंतर घाबरलेल्या ठेकेदाराने पोलिसांना या घटनेची माहिती दिली.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी बंगल्याच्या आवारातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.