पुण्यात १६२ नगरसेवक

महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार येत्या शुक्रवारी (७ ऑक्टोबर) जाहीर करण्यात येणार आहे. निवडणुकीसाठी ४१ प्रभागातून १६२ पदांचे आरक्षण काढण्यात येणार आहे. पुण्यातील १६२ जागांमधील २२ जागा अनुसूचित जाती, २ जागा अनुसूचित जमाती आणि ९४ जागा सर्वसाधारण गटासाठी खुल्या असतील, तर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी ४४ जागा राहणार आहेत. आरक्षण सोडती दरम्यान प्रभागांचे एकत्रित आणि स्वतंत्र नकाशे प्रकाशित करण्यात येणार असल्यामुळे प्रभाग कशा पद्धतीने तयार झाले आणि कोणकोणत्या प्रभागांची मोडतोड झाली, कोणते आरक्षण कोणाच्या फायद्याचे तर कोणाला नुकसान हेही शुक्रवारी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीचा बिगुल शुक्रवारी वाजेल.

महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. ही निवडणूक चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार असून त्यासाठीचा कार्यक्रम आयोगाकडून ऑगस्ट महिन्यात जाहीर करण्यात आला आहे. त्याची प्रारूप प्रभाग रचनाही महापालिकेकडून तयार करण्यात आली आहे. त्यातच आता सर्वाना उत्सुकता असलेल्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आणि प्रभागाची रचना शुक्रवारी स्पष्ट करण्यात येणार आहे. महापालिकेच्या ४१ प्रभागातील आरक्षित जागांच्या सोडतीसाठीची कार्यवाही गणेश कला क्रीडा रंगमंच येथे सकाळी अकरा वाजता सुरू होणार असल्याची माहिती महापालिकेच्या निवडणूक शाखेचे प्रमुख सतीश कुलकर्णी यांनी दिली. महापालिकेच्या ४१ प्रभागांपैकी २ प्रभाग हे तीन सदस्यीय आहेत. उर्वरित ३९ प्रभाग हे चार सदस्यीच असून प्रत्येक प्रभागातून निवडून द्यायच्या सदस्य संख्येनुसार प्रभागातील जागांना प्रभागांच्या अनुक्रमांकांनी संबोधण्यात येणार आहे. त्यासाठी ४१ प्रभागांच्या छापील चिठ्ठय़ा तयार करण्यात येणार असून त्याद्वारे प्रभागातील जागा सोडतीने निश्चित करण्यात येतील. प्रभागांमध्ये राखीव जागांचे वाटप करणे आणि त्या जागा चक्रानुक्रमे फिरविण्याच्या पद्धतीनुसार तीन जागांचे दोन प्रभाग असलेल्या एका प्रभागामधील दोन जागा आणि दुसऱ्या प्रभागामधील एक जागा महिलांसाठी राखून ठेवण्यात येणार आहे. दोन प्रभागातील कोणत्या प्रभागात महिलांसाठी दोन जागा असतील हे या दोन प्रभागातून सोडतीने निश्चित करण्यात येणार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासवर्गीय प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्ग अशा पद्धतीमध्ये आरक्षित जागांची ही विभागणी होणार आहे.

  • एकूण प्रभागांची संख्या ४१
  • नगरसेवकांची संख्या १६२
  • ३९ प्रभाग चार सदस्यांचे
  • २ प्रभाग तीन सदस्यांचे

chart