पुणे : मुंबईहून परदेशी बनावटीचे फर्निचर घेऊन निघालेल्या टेम्पोला आग लागल्याची घटना मुंबई-बंगळुरु बाह्यवळण मार्गावर वारजे परिसरात घडली. आगीत टेम्पोसह फर्निचर भस्मसात झाले. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही.
बाह्यवळण मार्गावरुन शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास टेम्पो निघाला होता. वारजे पुलाजवळील सेवा रस्त्यावर अचानक टेम्पोने पेट घेतला. टेम्पोत फर्निचर होते. टेम्पो पेटल्यानंतर फर्निचरला झळ पोहोचली. टेम्पोतील चालकाने प्रसंगावधान राखून बाजूला नेला. टेम्पो चालक बाहेर पडल्याने बचावला.
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अग्निशमन दलाचे जवान रमेश भिलारे, धर्मराज माने, निलेश तांगुदे, सिद्धेश भगत, प्रतिक पांगसे, दत्ताराय शेटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. अग्निशमन दलाच्या जवानांनी टेम्पो चालकाची चौकशी केली.
तेव्हा मुंबईहून परदेशी बनावटीचे फर्निचर घेऊन पुण्यात आला होता, अशी माहिती चालकाने दिली. आगीत महागडे फर्निचर भस्मसात झाले. आगीमागचे निश्चित कारण समजू शकले नाही, अशी माहिती अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.
