पुणे : दिवाळीनंतर दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची वेळ पुण्यावर येणार, असे स्पष्ट झाल्यानंतर पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपला जाग आली. पुणेकरांना कोणत्याही परिस्थितीत पाणी कमी पडू देणार नाही, अशी भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दरबारी जाण्याचीही तयारी असल्याचे स्पष्ट केले.

कालवा समितीच्या बैठकीनंतर, १ नोव्हेंबर २०२६ ते ३० जून २०२७ या काळात पुण्याला केवळ ७.१५ टीएमसी पाणी मिळेल, असे स्पष्ट झाले. त्यानंतर, ‘शहराची लोकसंख्या आणि पाण्याची गरज लक्षात घेऊन १ नोव्हेंबर ते ३० जून कालावधीसाठी शहराला १३ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांना भेटून करू,’ असे स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

राज्यात निर्माण झालेली दुष्काळाची स्थिती आणि धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्याचा विचार करून पाण्याचे नियोजन करण्यासाठी दोन दिवसांपूर्वी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह शहरातील तीन आमदार, महापौर मंजूषा नागपुरे आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये पुणे शहरासाठी वर्षभरासाठी १३.५ टीएमसी पाणीसाठा मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

हा पाणीकोटा १ जुलै २०२६ पासून ३० जून २०२७ पर्यंत असल्याचे स्पष्टीकरण शुक्रवारी देण्यात आले. सध्या पहिल्या चार महिन्यांतच महापालिकेने ६.३५ टीएमसी पाण्याचा वापर केला असल्याने आता महापालिकेला ७.१५ टीएमसीच पाणी वापरता येईल, असे स्पष्ट झाले. परिणामी, दिवाळीनंतर एक दिवसाआड पाणी देण्याची तयारी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे.

याबाबत महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले म्हणाले, ‘या बैठकीला मी निमंत्रित नव्हतो. तेथे आमदार, मंत्र्यांनी काय भूमिका मांडली याची माहिती नाही. परंतु, माहिती घेतली जाईल. पुणेकरांना पाणी कमी पडू दिले जाणार नाही. पाणी बचतीसाठी पुणेकरांच्या पाण्यात दहा टक्के कपात करण्यात आली आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. कालवा समितीत निश्चित केलेले ७.१५ टीएमसी पाणी पुढील आठ महिन्यांसाठी ८० लाख लोकसंख्येला पुरणार नाही.

कालवा समितीने घेतलेल्या निर्णयाची माहिती घेऊन पुणे महापालिकेसाठी १ नोव्हेंबरपासून पुढील ३० जूनपर्यंत १३ टीएमसी पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे. पुढील आठवड्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणार असून, त्यांच्याकडून पुणेकरांच्या पाण्याच्या कोट्यात वाढ करून घेण्याचा प्रयत्न राहणार आहे.’