पुणे : पुरेशा पाण्यापासून वंचित असलेल्या पुणेकरांना पुन्हा एकदा पाणीगळती रोखण्याचे आश्वासन महापालिका प्रशासनाने दिले आहे. जुन्या टाक्यांची दुरुस्ती, नवीन टाक्यांची बांधणी करण्याबरोबरच पाण्याची गळती शोधण्यासाठी रोबोसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर प्रशासन करणार आहे. या उपाययोजनांनंतर तरी किमान पाणीपुरवठा सुरळीत होईल, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.
पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप म्हणाले, ‘शहरातील अनेक भागांत आजही पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. जुन्या आणि खराब झालेल्या जलवाहिन्यांमुळे पाणीपुरवठा करताना अनेक अडचणी निर्माण होतात. यावर मात करण्यासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने विविध उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे. जुन्या टाक्यांची दुरुस्ती, नवीन टाक्यांची बांधणी करण्याबरोबरच पाण्याची गळती शोधण्यासाठी रोबोसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.’
‘शहरातील सर्व भागातील नागरिकांना एकसमान पाणीपुरवठा व्हावा, यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. आजही शहरातील काही भागांतील जलवाहिन्या जुना आणि खराब झाल्याने त्यामधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याचे समोर आले आहे. त्यावर आवश्यक त्या उपाययोजना प्रशासनाने सुरू केल्या आहेत,’ असे सांगून जगताप म्हणाले, ‘पाषाण लिंक रोड परिसरात असलेल्या इंग्रजांच्या काळातील पाण्याच्या टाकीची क्षमता आणि संरचना कमकुवत झाली होती. या टाकीतून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होत असल्याने दररोज सुमारे चार एमएलडी पाणी वाया जात होते. महापालिकेने यामध्ये आवश्यक ती दुरुस्ती व सुधारणा केल्यानंतर ही गळती थांबली.’
‘बोपोडी परिसरातील भोईटे वस्तीमध्ये पाण्याची टंचाई जाणवत असल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत होते. मात्र, पाणीपुरवठा व्यवस्थेतील सुधारणा आणि नव्या जोडण्यांमुळे या भागातील टँकरची मागणी आता कमी झाली आहे. तसेच, कात्रज-कोंढवा परिसरातील जलवाहिनीत नवीन बदल करण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर येथील पाण्याचा दाब आणि उपलब्ध होणारे पाणी यामध्ये बदल होईल. हांडेवाडी भागात आतापर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. भुजबळ टाउनशिप येथील नव्या टाकीमुळे आता या भागात दररोज पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.’
‘धायरीतील काही उच्चदाब क्षेत्रांमध्ये काही सुधारणा केल्या जात आहेत. इंद्रप्रस्थ, हडपसर बस डेपो-२, तुकाई टेकडी, माणिकबाग आणि क्रिसेंट एक येथील टाक्या लवकरच कार्यान्वित होणार आहेत. तसेच, फर्ग्युसन टेकडीवरील शहरातील सर्वात मोठी पाण्याची टाकीही सुरू होण्याच्या मार्गावर आहे. या टाकीचा फायदा टेकडी परिसरासह मध्यवर्ती पेठांनाही होईल,’ असा दावा जगताप यांनी केला.
‘३५ हजार मीटर बसविण्याचे काम बाकी’
‘शहरात ३५ हजार मीटर बसविण्याचे काम अद्याप बाकी आहे. हे काम टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे. नव्या नियोजनामुळे जलवाहिन्यांची एकूण लांबी कमी करण्यात आली असून, यामुळे देखभाल खर्चात बचत होऊन पाण्याचा दाब अधिक प्रभावीपणे नियंत्रित करता येणार आहे. हे जलमीटर बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा दाब वाढणार आहे,’ अशी माहिती पाणीपुरवठा विभागाने दिली.

