पुणे : उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याची टंचाई जाणविण्यास सुरुवात झाली आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच टँकरची मागणी साडेसहा हजारांनी वाढली असून, मार्च महिन्याच्या अखेरीस यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यात ४६ हजार ०६८ टँकरच्या फेऱ्या झाल्या. गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात ३९ हजार ४८८ टँकर सुरू होते, तर त्या आधीच्या वर्षात फेब्रुवारी महिन्यात ३३ हजार ९५१ टँकर सुरू होते. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
डिसेंबरपासूनच शहरातील विविध भागांत टँकरची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात टँकरची मागणी वाढत असून, पुढील काही महिन्यांमध्ये उन्हाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेता टँकरचीही संख्या वाढणार असल्याचे निश्चित आहे. धनकवडी, कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, किरकिटवाडी, वडगाव बुद्रुक, धायरी, वाघोली, धानोरी, लोहगाव, सूस, पाषाण या भागांतून टँकरची मागणी वाढण्यास सुरुवात झाली आहे. ज्या भागांत महापालिकेला पाणीपुरवठा करण्यास जमत नाही, जेथे कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होतो किंवा जलवाहिन्यांचे जाळे विकसित झालेले नाही, त्या भागांत महापालिका टँकरद्वारे पाणीपुरवठा करते.
ज्या परिसरात महापालिका पाणीपुरवठा करू शकत नाही तेथे टँकरच्या माध्यमातून हे पाणी मोफत दिले जाते. तसेच, शहराच्या विविध भागांतील नागरिकांच्या मागणीनुसार महापालिका ठरावीक शुल्क घेऊन पाणीपुरवठा विभागाकडून टँकरद्वारे पाणी देते. खासगी ठेकेदारांना टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिका कमी दरात टँकर भरून देते. खाजगी टँकरच्या द्वारे देखील अनेक सोसायटी पाणी घेतात. यासाठी काही नियम घालून दिलेले आहेत. त्यांचे पालन करून निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दराने टँकर मालकांना पिण्याच्या पाण्याचे शुल्क आकारता येत नाही. मात्र याकडे दुर्लक्ष करत खाजगी टँकर चालक मनमानी पद्धतीने शुल्क आकारत असल्याचाही काही तक्रारी महापालिकडे येण्यास सुरुवात झाली आहे.
टँकर भरण्यासाठी महापालिकेने पर्वती, वडगाव शेरी, धायरी, रामटेकडी, चतु:श्रृंगी, पद्मावती आणि पटवर्धन बाग या सात ठिकाणी टँकर पॉइंटची व्यवस्था केली आहे. या ठिकाणांहून महापालिकेच्या मालकीचे, तसेच ठेकेदारांचे टँकर नागरिकांना पाणीपुरवठा करतात. पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप म्हणाले, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे काही भागांत टँकरची मागणी वाढत आहे. नागरिकांना अडचण येऊ नये, यासाठी आवश्यकतेनुसार टँकरची संख्या वाढवली जात आहे.
यंदाची टँकरवाढ
जानेवारी : ४२ हजार ५४२
फेब्रुवारी : ४६ हजार ६८
फेब्रुवारीतील टँकरची आकडेवारी
२०२३-२४ : ३३ हजार ९५१फेब्रुवारी
२०२४-२५ : ३९ हजार ४८८
२०२५-२६ : ४६ हजार ०६८
