पुणे : शहराला मंजूर कोट्यानुसार, पुढील १० महिन्यांकरिता केवळ ७.१५ टीएमसी इतकेच पाणी उपलब्ध असल्याने दिवाळीनंतर शहरात दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागणार असल्याच्या शक्यतेवर आता शिक्कामोर्तब झाले आहे. शहराची लोकसंख्या वाढूनही त्या तुलनेत पाणीकोटा न वाढल्याचा हा फटका असून, कालवा सल्लागार समितीत पाणीकोटा अंतिम करताना शहरातील सत्ताधारी भाजपच्या एकाही लोकप्रतिनिधीने विरोध कसा केला नाही, याबाबत आता आश्चर्य व्यक्त होत आहे.

कालवा सल्लागार समितीच्या गुरुवारी झालेल्या बैठकीत शहराला १३.५ टीएमसी कोटा मंजूर करण्यात आला. हा कोटा १ नोव्हेंबरपासून पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यापर्यंत असा नसून, गेल्या १ जुलैपासून पुढील वर्षी ३० जूनपर्यंतचा असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. सध्या १ जुलैपासून ऑक्टोबरपर्यंतच्या चार महिन्यांत शहराने ६.३५ टीएमसी पाणी वापरले आहे. त्यामुळे आता जूनअखेरपर्यंत ७.१५ टीएमसी इतकेच पाणी वापरता येणार आहे. परिणामी, आणखी पाणीकपातीला पर्याय राहिलेला नाही.

कालवा सल्लागार समितीची बैठक उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. त्यामध्ये शहराच्या पाणीकोट्याचा निर्णय होताना, त्या विरोधात बैठकीला उपस्थित असलेल्या एकाही आमदाराने अथवा लोकप्रतिनिधीने ठाम भूमिका घेतली नाही, असा आरोप होतआहे. इतकेच नाही, तर पुण्यातील महत्त्वाचे नेते तर या बैठकीलाच अनुपस्थित राहिले.

‘एल-निनो’मुळे यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यातच ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पुरेसा पाउस न झाल्याने जिल्ह्यातील रब्बी पिकांसाठी खडकवासला धरण साखळीतून पाणी सोडण्यात आले. आता धरणातील उपलब्ध पाणी केवळ पिण्यासाठीच वापरण्यास प्राधान्य देण्यात आले असून, १० टक्के पाणीकपातीचे राज्य सरकारचे आदेश आहेत. त्यानुसार, पुण्यात दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे.

महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर म्हणाल्या, कालवा समितीच्या बैठकीत शहरासाठी १३.५ टीएमसी पाणी कोटा मंजूर झाला. त्यापैकी ६.३५ टीएमसी पाणी आतापर्यंत वापरले गेले. त्यामुळे उर्वरित ७.१५ टीएमसी पाणी ३० जूनपर्यंत पुरवावे लागणार आहे. गरजेपेक्षा उपलब्ध पाणी फारच कमी असल्याने दिवाळीनंतर शहरात एक दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागेल. या संदर्भात महापौर व सर्व पक्षनेत्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल.

धरणांत पाणी किती?

सन २०१५ मध्ये धरणात १५ टीएमसी पाणी असताना एक दिवसाआड पाणीकपात लागू झाली होती. यंदा पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांत मिळून सध्या सुमारे २४ टीएमसी पाणी आहे. तरीही दिवसाआड पाण्याची चर्चा होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्या उपलब्ध पाणी शहराबरोबरच जिल्ह्यातील इतर भागांना पिण्यासाठी द्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे बाष्पीभवन व गळतीही विचारात घ्यावी लागेल, असा यावर युक्तिवाद केला जात आहे.

या लोकसंख्येचा विचार कधी?

गेल्या काही वर्षांमध्ये शहराच्या विस्तारामुळे पुण्याची लोकसंख्या ८० लाखांवर गेली आहे. त्यामुळे महापालिकेची पाण्याची गरज दरमहा १.६५ टीएमसीवर पोहोचली आहे. पुणे महापालिकेला वर्षभरात २० टीएमसीहून अधिक पाणी लागते. मात्र, केवळ १३.५ टीएमसी कोटा मंजूर झाला आहे.